इगतपुरीनामा न्यूज, दि. १४
पैशांचा व राजकीय बळाचा वापर करून मंदाबाई धांडे यांचे पती रामदास धांडे यांनी आमच्यावर अन्याय केला आहे. तहसीलदारांनी दिलेल्या संपुर्ण बिनशेती प्रकरणाची सखोल चौकशी करून बेकायदेशीर करण्यात आलेले बांधकाम पाडण्यात यावे. शासन नियम डावलून चुकीचे काम केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केल्यामुळे मारहाणीचा प्रयत्न करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करावी या मागणीसाठी पाडळी देशमुख येथील योगीराज धांडे, रखमाबाई धांडे, रतन धांडे हे कुटुंब आमरण उपोषणाला बसले आहेत. डॉ. आंबेडकर जयंतीदिनी तहसीलदार इगतपुरी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू झाले आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, इगतपुरी तहसीलदार यांच्या कार्यक्षेत्रातील पाडळी देशमुख येथील गट नंबर ४२२ मंदाबाई रामदास धांडे यांचा नवीन खरेदीचा आहे. त्यामागे आमचा वडिलोपार्जित गट नंबर ४२४ असुन सदर ४२२ गट नंबर बिनशेती करण्याकामी सर्व नियम व अटी बाजुला ठेऊन सदर गट बिनशेती करण्यात आला. मात्र सदर प्रकरणी बिनशेतीची सनद मिळण्या आधीच नोव्हेंबर २०२१ मध्ये इगतपुरीचे तहसीलदार यांना लेखी तर ४ नोव्हेंबर २०२१ रोजी जिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी यांच्याकडे हरकत नोंदवली होती. मात्र तक्रार अर्जाची अद्याप कुठलीही दखल घेतली नसुन सदर ४२२ गटामध्ये सद्यस्थितीत बांधकाम होऊन त्यात व्यवसाय सुरु करण्यात आला आहे. याबाबत तहसीलदारांकडे १ फेब्रुवारी रोजी तक्रार केली असता त्यांनी हे काम बंद करण्याबाबत कार्यवाही करत असल्याचे सांगितले. मात्र मंदाबाई धांडे यांचे पती रामदास धांडे यांनी ते काम बंद न करता उलट अधिक वेगाने करून पूर्ण केले. तहसीलदार यांच्याकडे तक्रार केल्यावरून रामदास धांडे यांनी रतन धांडे यांना शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र तहसीलदारांनी सांगुनही बांधकाम बंद झालेच नाही. त्यांनी शासनाचे नियम डावलून बेकायदेशीर काम करून आमच्यावर अन्याय केला आहे असे निवेदनात नमूद आहे.
पुढे म्हटले आहे की, प्रश्नाधीन गटातील काही क्षेत्र महामार्गात व काही क्षेत्र हे महामार्गाच्या चौपदरीकरणात संपादित झाले असुन त्याबदल्यात शासनाकडून मोबदलाही अदा झाला आहे. मात्र संपादित झालेले क्षेत्र हे उताऱ्यावरून वजा झाले नाही याचाच गैरफायदा मंदाबाई रामदास धांडे यांनी घेऊन सदर गट हा बिनशेती करण्यात आला आहे असा आरोप करण्यात आला आहे. ह्या क्षेत्रातून पीडितांना जाण्यासाठी रस्ता न सोडता बिनदिक्कत बांधकाम केले. याबाबत इगतपुरीचे तहसीलदार, पाडळी देशमुखचे तलाठी, वाडीवऱ्हेचे मंडल अधिकारी यांना याबाबत सर्व कैफियत लेखी अर्जाद्वारे मांडूनही याकडे दुर्लक्ष केले. बिनशेती करणेकामी सर्व निकष बाजुला ठेऊन मंडळ अधिकारी यांनीही प्रत्यक्ष स्थळावर न जाता अहवाल बनवुन तो तहसीलदारांना सादर केला. यातून शासनाचीही फसवणूक झाली आहे. याबाबत इगतपुरीचे तहसीलदार तसेच मंडळ अधिकारी यांच्या निदर्शनास आणुन देऊनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. म्हणून अन्याय दूर करून न्याय मिळावा यासाठी आमरण उपोषण करीत असल्याचे शेवटी निवेदनात म्हटले आहे.