रेल्वे प्रवाशांचे मोबाईल चोरणारे दोघे जेरबंद

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३० ( संदीप कोतकर, इगतपुरी )
धावत्या रेल्वेतून प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या दोन चोरांना इगतपुरी रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी इगतपुरी रेल्वे स्थानकात मोठ्या शिताफीने अटक केली. चोरट्यांनी चोरलेला  १ मोबाईल देखील हस्तगत करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी नासिक रोडहून मुंबई कडे जाणारी हावडा एक्स्प्रेस इगतपुरी स्थानकात आली असता सर्वसाधारण डब्यातील प्रवासी कुंदन चौधरी रा. भोजपुर,बिहार याने रेल्वे सुरक्षा दलाच्या महिला कर्मचारी अमिषा पटेल यांना आपला मोबाईल चोरी गेल्याचे सांगितले.
त्यांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या इगतपुरी स्थानकावर कार्यरत असलेले कॉन्स्टेबल विजय माने व सबनीस कुमार यांना याविषयी माहिती दिली. त्यांनी तात्काळ डब्यातील प्रवाश्यांची
विचारपूस  केली. यात विनोद विलास सावंत वय 32  रा. मुंबई व अरुण वाहूले वय 39  रा. खडवली, मुंबई हे दोन्ही प्रवासी संशयित मिळून आले. त्यांच्याकडे ५ हजार रुपये किमतीचा संगनमताने चोरी केलेला मोबाईल मिळून आला. याप्रकरणी इगतपुरी लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरी गेलेला मोबाईल तात्काळ मिळाल्याने फिर्यादी कुंदन चौधरी यांनी रेल्वे सुरक्षा दलाचे आभार मानले.