कृषी विभागातर्फे गाव बैठका, प्रशिक्षणाद्वारे खरीप हंगाम मार्गदर्शन

इगतपुरीनामा न्यूज, दि. २८
तालुका कृषी अधिकारी इगतपुरी कार्यालयामार्फत तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या अनुषंगाने मार्गदर्शन सुरू करण्यात आले आहे. कोरोना नियमांचे पालन करून गाव बैठका, प्रशिक्षणाद्वारे खरीप हंगाम मार्गदर्शन करण्यात येत असल्याची माहिती इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी शितलकुमार तंवर यांनी दिली
खरीप हंगाम यशस्वी होण्याच्या दृष्टीने कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना पेरणीपूर्व बियाण्यांची उगवण क्षमता तपासणे, बियाण्याला जैविक रासायनिक बीज प्रक्रिया करणे याची प्रात्यक्षिके करून दाखवण्यात येत आहे. संबंधित गावचा सुपीकता निर्देशांक लक्षात घेऊन रासायनिक खतांचा योग्य वापर कसा करावा हे सांगितले जात आहे. यावर्षी कृषी विभागाने शिफारशीपेक्षा 10 टक्के खताचा वापर कमी करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. याबाबत शेतकऱ्यांना सर्वांगीण मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे श्री. तंवर यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना भात लागवडीचे तंत्रज्ञान, चारसूत्री भात लागवड, भात लागवडीची एसआरटी पध्दत, यंत्राद्वारे भात लागवड, याची माहिती दिली जात आहे. मागील वर्षी कृषी विभागाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारात गर्दी होणार नाही यासाठी शेतकऱ्यांना गटांच्या मार्फत गावातच बियाणे व खतांचा पुरवठा करण्याचे नियोजन केले होते. याहीवर्षी असे नियोजन होणार आहे.  याशिवाय शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने लघुसंदेश, सोशल मीडिया, माहिती पत्रक, चित्रफीत याद्वारे प्रचार व प्रसिद्धीचे कार्य कृषी सहाय्यकांच्या मार्फत केले जात आहे
मंडळ कृषी अधिकारी भास्कर गीते, अनिल मुजगुडे, चंद्रशेखर अकोले, किशोर भरते, रामा दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली वासाळी, रामनगर, बारशिंगवे, काननवाडी, ठाकूरवाडी, दौंडत, उभाडे, साकुर, शेनीत, घोटी खुर्द, कवडदरा, बोर्ली, धार्णोली,  बिटूर्ली, धारगाव, ओंडली, नागोसली, त्रिंगलवाडी, बोरटेंभे, अडसरे बुद्रुक, भंडारदरावाडी या गावांमध्ये कृषी सहाय्यकांमार्फत प्रशिक्षण घेण्यात आलेले आहे. उर्वरीत गावात लवकरच प्रशिक्षणे घेतली जातील असे शितलकुमार तंवर यांनी शेवटी सांगितले.