इगतपुरीनामा न्यूज, दि. १०
इगतपुरी तालुका म्हणजे प्रभू श्रीरामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला तालुका आहे. प्रभू रामाच्या विविध पाऊलखुणा तालुक्यातील विविध भागात आहेत. या पार्श्वभूमीवर श्रीरामनवमीनिमित्त प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. तालुक्यातील विविध मंदिरांमध्ये प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेण्यासाठी दिवसभर भाविकांची अलोट गर्दी झाली. राम मंदिरांमध्ये पहाटे रामजन्मोत्सवाचा कार्यक्रम शेकडो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. अनेक गावांत उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह सुरू झालेले आहेत. यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.
इगतपुरी तालुका रामभक्त मंडळ, अखिल भारतीय वारकरी संप्रदाय यांनी ही रथयात्रा काढली. आज सकाळी ७ वाजता श्री क्षेत्र कावनई येथून सुरू झालेली रथयात्रा मुकणे, पाडळी देशमुख, जानोरी, नांदूरवैद्य, बेलगाव कुऱ्हे, कुऱ्हेगाव, सांजेगाव, मुरंबी, वाडीवऱ्हे या गावांमध्ये पोहोचली. मार्गावरील प्रत्येक गावात रथयात्रेचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. भाविकांनी रामाच्या प्रतिमेचे पूजन केले.आकर्षक रांगोळ्या, सडा, फुलांची सजावट, आरत्या, घोषणा यांनी सर्व गावे निनादली. फटाक्यांची आतषबाजी आणि श्रीराम भजनांनी अध्यात्मिक वातावरणाची अनुभुती आली. सायंकाळी ७ वाजता गोंदे दुमाला येथे रथयात्रा पोहोचली. संपूर्ण गावात यात्रेचे स्वागत झाले. त्यानंतर ह्या यात्रेचा समारोप झाला. यानिमित्ताने इगतपुरी तालुक्यातील रामभक्त, राजकीय नेते, पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.