सामान्य नागरिकांसाठी इगतपुरी येथील शासकीय विश्रामगृहाचे विस्तारीकरण करावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी : राज्यपालांच्या सुचनेचे इगतपुरी तालुक्यात स्वागत

इगतपुरीनामा न्यूज, दि. १०

मुंबई आग्रा महामार्गावरील इगतपुरी येथील सार्वजनिक बांधकाम खात्याचे शासकीय विश्रामगृहाचे विस्तारीकरण करावे अशी महत्वाची सूचना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केली आहे. नाशिक दौऱ्यावर असतांना इगतपुरी विश्रामगृहात राज्यपालांनी अभिप्राय पुस्तकात ही सूचना मांडली आहे. महाराष्ट्र सरकार याबाबत निश्चितपणे योग्य निर्णय घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांच्याकडून ह्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते. राज्यपालांनी केलेल्या महत्वाच्या सुचनेचे इगतपुरी तालुक्यातील विविध भागातून स्वागत सुरू आहे.

इगतपुरी तालुका राज्याचे आणि मुंबईचे प्रवेशद्वार आहे. यासह ह्या तालुक्यात मोठ्या गतीने पर्यटन आणि पर्यटक वाढत आहेत. त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंग, प्रभू रामाच्या वास्तव्याने पावन झालेले नाशिक, भंडारदरा धरण, सप्तशृंगी देवी, शिर्डी आदी महत्वाच्या ठिकाणांसाठी इगतपुरी हे केंद्र आहे. त्यानिमित्ताने पर्यटनाच्या सुविधा वाढत आहेत. तथापि सामान्य नागरिक आणि पर्यटक यांच्यासाठी शासनाकडून पाऊल उचलणे आवश्यक आहे. याबाबत नेहमीच अनेक नागरिकांकडून विविध मागण्या होत असतात. या पार्श्वभूमीवर राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी विश्रामगृह विस्तारीकरण करण्याची सूचना केली. ह्या सुचनेचे इगतपुरी तालुक्यात स्वागत करण्यात येत आहे. विस्तारीकरण झाल्यास विविध सुविधायुक्त खोल्या सामान्य नागरिक आणि पर्यटकांसाठी उपलब्ध होतील. सध्याच्या परिस्थितीत ह्याठिकाणी २ सूट असून मुंबई जवळ असल्याने ते सूट नेहमीच फुल्ल असतात.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!