गोरख बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली मोडाळे गावाची उत्तुंग भरारी
इगतपुरीनामा न्यूज, दि. १०
भारत सरकारच्या वतीने देशपातळीवर दिला जाणारा मानाचा पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार नाशिक जिल्ह्यात मोडाळे ग्रामपंचायतीला घोषित झाला आहे. 24 एप्रिलला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जम्मू येथे होणाऱ्या पुरस्कार वितरण समारंभात ह्या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. इगतपुरी तालुक्यातील मोडाळे ह्या गावाने केलेल्या शाश्वत विकासाची ही पोचपावती मिळाली असल्याने जिल्हाभर मोडाळे गावाचे कौतुक करण्यात येत आहे. जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी ह्या पुरस्काराबद्धल आनंद व्यक्त केला आहे.
पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कारासाठी देशाच्या सगळ्या राज्यांतून अनेक ग्रामपंचायती सहभाग घेत असतात. यामध्ये महाराष्ट्र राज्यातील शेकडो ग्रामपंचायतींनी भाग घेतला होता. यापैकी राज्यातील उल्लेखनीय १४ निवडक ग्रामपंचायतींमध्ये मोडाळे गावाची निवड पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. गावाचा सर्वांगीण विकास, स्वच्छता, नागरी सुविधा, नैसर्गिक साधन संपत्तीचे व्यवस्थापन, ई. गव्हर्नरन्स आदी क्षेत्रामध्ये ग्रामपंचायतीने या उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. मोडाळे हे गाव गतिमान वेगाने विकास करणारे इगतपुरी तालुक्यातील महत्वाचे गाव आहे. गावात सर्व प्रकारच्या मूलभूत सोई-सुविधा नागरिकांना पुरविण्यात येतात. त्यामुळे यापूर्वी देखील गावाला अनेक पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून ह्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी आम्ही गावातील पदाधिकारी व ग्रामस्थ गावाचा विकास करण्यासाठी झपाटून प्रयत्न करत होतो. अखेर आमच्या प्रयत्नांना यश मिळाले हे आमचे नशीब समजतो. ह्या पुरस्काराच्या माध्यमातून उर्वरित विकासकामे पूर्ण करून गावाचे नंदनवन बनवू.
- गोरख बोडके, जिल्हा नियोजन समिती सदस्य
गावांचा सर्वांगीण विकास, अनेक विकासकामांच्या निकषावर राज्यातील 14 गावे आणि मोडाळे गाव ह्या राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी ठरले. लाखो रुपयांची विकासकामे करण्यासाठी केंद्र सरकारकडून आता गावाला निधी मिळणार आहे. नाशिकचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांनी कौतुक केले आहे. जिल्ह्यातील मोडाळे ग्रामपंचायतीचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव होणे ही जिल्हावासीसाठी सार्थ अभिमानाची घटना आहे. ग्रामीण भागातील ग्रामपंचायती गतिमान होत असल्याचे हे उदाहरण असल्याचे कौतुक सर्वत्र सुरू आहे.