सुनील बोडके : इगतपुरीनामा न्यूज, दि. ८
सातारा जिल्ह्यात सुरू महाराष्ट्र केसरी स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचा मल्ल पै. बाळू बोडके याने 86 किलो वजनी गटात सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. प्रतिस्पर्धी ऋषिकेश लांडे या पैलवानाचा पराभव करत विजय प्राप्त केला.
बाळू बोडके नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या वेळुंजे गावचा सुपुत्र आहे. त्याच्या विजयाने जिल्हाभरात त्याचे अभिनंदन केले जात आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल पुणे अर्जुन वीर पुरस्कार विजेते काकासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बाळू सराव करत आहे.या स्पर्धेसाठी गुरु हनुमान आखाडा साकुर फाटाचे ज्ञानेश्वर शिंदे यांचे त्याला मार्गदर्शन लाभले.
बाळूचे बंधू पै. सचिन बोडके याने कसून मेहनत करून घेतल्याने आज बाळूने त्र्यंबकवासीयांना सुवर्ण दिवस दाखवला. याआधी मानाच्या समजल्या जाणाऱ्या उत्तर महाराष्ट्र केसरीला तीन वेळा गवसणी घातली. यासह अनेक स्पर्धा बाळूने जिंकल्या आहेत. इंटरनॅशनल कोच अमोल काशीद, छत्रपती पुरस्कार विजेते पै. गोविंद पवार शिवछत्रपती पुरस्कार विजेते गोरख बलकवडे, बाळूचे वडील दौलत बोडके यांचे मोलाचे मार्गदर्शन बाळूला लाभले. बाळूला घडवण्यामागे सर्वात मोठा सिंहाचा वाटा माजी आमदार अपूर्व हिरे यांचा आहे. गेल्या चार वर्षापासून बाळूला आर्थिक मदत अपूर्व हिरे यांनी सुरू केली त्यामुळे आज बाळू बोडके यश संपादन करु शकला.