गावांतील जमिनीचे अधिकार अभिलेख तयार झाल्याने वादविवाद थांबतील – आमदार हिरामण खोसकर : इगतपुरी भूमी अभिलेखतर्फे स्वामित्व योजनेतंर्गत सनद वाटप संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. ८

बऱ्याच गावामधे जागेचे वादविवाद आपल्याला प्रचंड प्रमाणात पहायला मिळतात. अनेक गावातील सरकारी जमिनीवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण आहे. ह्या पार्श्वभूमीवर स्वामित्व योजनेचा फायदा गावातील हद्दी निश्चित करण्यासाठी होणार आहे. गावांतील जागेच्या मिळकत पत्रिका उघडल्यामुळे आणि जागेचा अधिकार अभिलेख तयार झाल्यामुळे खरेदी विक्रीमध्ये पारदर्शकता येणार आहे. मिळकत पत्रिका धारकांना सदर मिळकतीवर कर्ज सुद्धा मिळू शकणार आहे. ह्या मोजणीमुळे राज्याच्या महसूलात वाढ होणार असल्याचे प्रतिपादन इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी केले. इगतपुरी तालुक्यातील त्रिंगलवाडी येथे आमदार हिरामण खोसकर यांचे हस्ते स्वामित्व योजनेंतर्गत नगरभूमापनाचे काम पूर्णं करून सनद वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी आमदार खोसकर यांनी इगतपुरी भूमी अभिलेख कार्यालयाचे कौतुक केले.

नगर भूमापन झालेले नाही अशा गावांतील जमिनीची मोजणी ड्रोनव्दारे झाली आहे. काही गावे सरकारी जमिनीवर असल्यामुळे त्यावरील मिळकती ह्या खाजगी आहेत. ह्या मिळकतीचे अधिकार अभिलेख नसल्यामुळे अतिक्रमण, जागेबाबत वाद विवाद इत्यादीचे निराकरण करणे महसूल न्यायालयाला जिकीरीचे होते. म्हणून इगतपुरी तालुक्यासाठी स्वामित्व योजना उपयोगी आहे असे उपअधीक्षक भूमी अभिलेख विष्णू भाबड यांनी यावेळी सांगितले. शिरस्तेदार मिलिंद जगताप म्हणाले की, महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाव्दारे इगतपुरी तालुक्यातील अनेक गावांच्या जमिनीची मोजणी ड्रोनव्दारे झालेली आहे. ही योजना केंद्र शासन पुरस्कृत “स्वामित्व” योजना असून याची अंमलबजावणी राज्य शासन करीत आहे. कार्यक्रमाप्रसंगी काँग्रेस नेते संदीप गुळवे, जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इगतपुरीच्या गटविकास अधिकारी लता गायकवाड, उप अधीक्षक भूमि अभिलेख इगतपुरी विष्णु भाबड, शिरस्तेदार मिलींद जगताप, नंदलाल नेरे, कांचनमाला स्वामी, हर्षाली जाधव आदींनी परिश्रम घेतले

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!