इगतपुरीनामा न्यूज, दि. ८
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ह्यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे संवेदना मोहिमेचे इंटरनॅशनल लाईफ सेव्हर अवॉर्ड पारितोषिक समारंभ पार पडला. नाशिक जिल्ह्यातून आनंदतरंग फाऊंडेशनचे शाहीर उत्तम गायकर ह्यांना त्यांच्या उत्कृष्ठ कार्याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते लाईफ सेव्हर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातून आनंदतरंग फाउंडेशन ह्या एकमेव संस्थेमार्फत रक्तदान शिबिर घेण्यात आले होते. यासह त्यांच्या विविध कामगिरीचा गौरव करण्यात आला.
संवेदना मोहिमे अंतर्गत मार्च २०२१ मध्ये संपूर्ण भारत तसेच अनेक देशांमध्ये १४७६ ठिकाणी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. ह्या शिबिरांमध्ये १ लाखाहून अधिक रक्त पिशव्या संकलित करण्यात आल्या. ह्या उपक्रमाची नोंद लंडन बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये घेण्यात आली.ह्यावेळी संवेदना मोहिमेचे आयोजन करणारे नॅशनल इंटिग्रेटेड फोरम ऑफ आर्टिस्ट अँड एक्टिविस्टचे संस्थापक प्रितपाल पनू , संवेदना मोहिमेचे महाराष्ट्रातील सहआयोजक व महाराष्ट्र अंत्रूपुनर्र चेंबरचे अध्यक्ष अमेय पाटील, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विनायक टेमबुर्लेकर व महाराष्ट्र शासनाचे जलसंपदा विभागाचे अधिकारी सतीश जोंधळे उपस्थित होते.