“दृष्टी पडता ब्रम्हगिरी । त्यासी नाही यमपुरी”
“नामा म्हणे प्रदक्षिणा । त्याचे पुण्या नाही गणना
सुनिल बोडके, इगतपुरीनामा न्यूज, दि. ३
आद्य ज्योतिर्लिंग असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर, संत निवृत्तीनाथ महाराज यांच्यावर सावली धरणाऱ्या ब्रम्हगिरीचे महत्व अनन्यसाधारण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या किल्ले ब्रह्मगिरीला जमीन माफियांनी पोखरून काढायचे काम सुरू केले होते. मात्र पर्यावरण प्रेमींच्या सजगतेमुळे मोठा अनर्थ टळणार आहे. किल्ले ब्रह्मगिरीचे उत्खनन रोखण्यासाठी व भू-माफियांविरुद्ध कायदेशीर लढा देण्यासाठी सर्व संमतीने ब्रह्मगिरी बचाव समिती स्थापन करण्यात आली आहे. पर्यावरण अभ्यासक, पर्यावरण प्रेमी देवचंद महाले यांचे नाव समितीचे अधिकृत प्रवक्ता म्हणून घोषित करण्यात आले आहे.
ब्रम्हगिरी बचाव समितीच्या सदस्यपदी रमेश अय्यर, निशिकांत पगारे, पत्रकार राम खुर्दळ, देवचंद महाले, जगबीर सिंग, तुषार पिंगळे, ललिता शिंदे, ललित लोहगावकर, प. पू. गणेशानंद महाराज, अरविंद निकुंभ, मनीष बाविस्कर, डॉ. संदीप आहेर, शेखर गायकवाड, वैभव देशमुख, योगेश कापसे, योगेश बर्वे, संदेश रहाणे, संजय अमृतकर, अमित खरे, संतोष नामदेव बोराडे, योगेश शास्त्री, प्रकाश निकुंभ, डॉ. खैरनार, प्रितम प्रेमराज भामरे, ओमकार दत्ताराम सानप, विनायक रमेश खुळे यांची नावे घोषित झाली आहेत.
ब्रम्हगिरीला पौराणिक, आध्यत्मिक दृष्ट्या अत्यंत महत्वपूर्ण ठिकाण मानले जाते. बारा ज्योतिर्लिंगांपैकी असणाऱ्या त्र्यंबकेश्वरमधील दुर्ग म्हणजे ब्रह्मगिरी होय. ब्रह्मगिरीच्या आसपास अंजनेरी, बसगड, उतवड यासारखे गडकोट या रांगेत उभे आहेत. यातील ब्रह्मगिरी हा सर्वात मोठा गड आहे. या गडाचे ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व तर आहेच, शिवाय पर्यटकांच्या दृष्टीने ब्रह्मगिरी ही एक पर्वणीच मानली जाते. उत्खननामुळे ब्रह्मगिरीचे अस्तित्व संपवण्यासाठी कारस्थान सुरू असल्याने बचावासाठी समितीची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
ब्रह्मगिरीबाबत महत्वाचे
तेराव्या शतकात ब्रह्मगिरी किल्ला व परिसरात देवगिरीचा राजा रामचंद्र याच्या भावाची राजवट होती. नंतर निझामशाही, शहाजी राजे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व मुघल अशा राजवटींत या किल्ल्याचे हस्तांतरण झाले. मुघल इतिहासकारांनी या किल्ल्याचा ‘नासिक’ असाच उल्लेख केला आहे. सन १६७० मध्ये शिवाजी महाराजांचा पेशवा मोरोपंत पिंगळे याने हा किल्ला जिंकून घेतला होता. छत्रपती संभाजी राजांच्या काळात राधो खोपडे हा फितूर झाल्याने मुघलांनी ब्रम्हगिरीगड मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. सन १६८९ पर्यंत हा किल्ला छत्रपती संभाजी राजांच्याच ताब्यात होता. त्र्यंबकेश्वर हे ब्रम्हगिरी गडाच्या पायथ्याचे ठिकाण होय. चहुबाजूंनी पर्वतांच्या वेढ्यात हे गाव वसलेले आहे.