
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील नांदगाव बुद्रुक शिवारात नांदगाव बुद्रुक व साकुर गावकऱ्यांच्या सतर्कतेने वाडीवऱ्हे पोलिसांकडून तत्परतेने दरोडेखोरांना अटक करण्यात आली आहे. नांदगाव ते साकुर दरम्यान दारणा धरणाच्या दोन मोरी जवळ रस्त्याच्या कडेला शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमाराला ७ ते ८ दरोडेखोर तीन मोटरसायकल वरून ट्रिपल सीट येवून रस्त्याच्या कडेला थांबले. हे दरोडेखोर हातात कोयता लोखंडी गज व लाठ्या काठ्या घेऊन उभे असल्याची माहिती नांदगावच्या ग्रामस्थांना मिळाली. त्यावेळी रस्त्याने साकुरकडे जाणाऱ्या पिकअप वाहनासमोर आडवे उभे होऊन ह्या दरोडेखोरांनी गाडीवर कोयता फेकुन मारला. त्यामुळे वाहनचालक किसन मारुती साळवे रा. साकुर हे घाबरुन गेले. त्यांनी गाडी थांबवल्यावर संशयित आरोपींनी त्यांची गच्ची धरुन मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यांच्या खिश्यातील रक्कम जबरीने काढुन घेऊन त्यांना मारहाण करु लागले. वाहनचालकाने प्रसंगावधान राखुन तेथुन पळ काढत पुढे काही अंतरावर उभ्या असलेल्या गावकऱ्यांना घडलेला प्रकार सांगितला. गावकऱ्यांना तात्काळ वाडीवऱ्हे पोलिसांना कळवले. ह्या ठिकाणी पोलीस पोहचेपर्यत गावकऱ्यांनी २ दरोडेखोरांना धरुन ठेवले होते. त्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेवुन ग्रामस्थांच्या मदतीने पोलीस उपनिरीक्षक भोईर, हवालदार दोंदे, अंमलदार बोंबले यांनी अन्य गुन्हेगारांचा त्याठिकाणी शोध घेवुन जंगलात लपलेल्या एका गुन्हेगाराला ताब्यात घेतले. ह्या प्रकरणी गावकऱ्यांनी केलेले सहकार्य व पोलीस लागलीच पोहचल्याने दरोडेखोरांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळाले. याबद्दल पोलिसांनी गावकऱ्यांचे कौतुक केले. फिर्यादी किसन मारुती साळवे रा. साकुर यांच्या फिर्यादीवरून वाडीवऱ्हे पोलिसांनी दरोड्याचा ८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यापैकी २ जण अटक करण्यात आले असून अन्य ४ ते ५ साथीदारांचा शोध सुरु करण्यात आला आहे. वाडीवऱ्हेचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, पोलीस उपनिरीक्षक भोईर आदींनी पुढील तपास सुरु केला आहे.