भास्कर सोनवणे । इगतपुरीनामा न्यूज, दि. २४
पक्की जिद्ध, उच्च ध्येय आणि उच्चतम कार्य उभे करण्याचा ध्यास असेल तर कोणतीही गोष्ट असाध्य नसते. बिकट आर्थिक परिस्थिती, शिक्षणाच्या अपुऱ्या सुविधा, जाण्यायेण्याची भ्रांत अशा कितीही अडचणी असल्या तरी मनात असलेला दुर्दम्य आशावाद पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. सगळ्या परिस्थितीच्या छाताडावर बसून यशाला गवसणी घालणारे एक व्यक्तिमत्व इगतपुरी तालुक्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील एका छोट्याश्या वाडीत घडले आहे. देवळेवाडी ह्या गावात राहणाऱ्या आदिवासी ठाकूर समाजातील साधारण परिवारातील डॉ. सखाराम सनू उघडे यांनी मिळवलेले धमाकेदार यश सर्वांसाठी आदर्श ठरले आहे. उच्चतम यश मिळवण्यासाठी लहानपणापासून प्रामाणिक अभ्यास आणि प्रयत्नांच्या जोरावर ग्रामीण आदिवासी भागातुन डॉ. सखाराम सनू उघडे यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आदिवासी ठाकूर बांधवांसह इगतपुरी तालुक्यातुन त्यांच्या यशाचे विशेष कौतुक केले जात आहे.
डॉ. सखाराम उघडे यांनी देवळे ता. इगतपुरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवी पर्यंत आणि आठवी ते बारावी पर्यंतचे शिक्षण घोटीच्या जनता विद्यालयात पूर्ण केले. त्यानंतर कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयात एम. कॉम. पूर्ण करून नाशिकच्या विधी महाविद्यालयात एल.एल.बी, डि.टी.एल. आदी शिक्षण पूर्ण केले. यानंतरही उसंत न घेता अधिकधिक शिक्षणाचा ध्यास सुरूच ठेवला. विशेष म्हणजे कोणताही क्लास न लावता आपल्या घरून पायपीट करून संपूर्ण शिक्षण घेतले. प्रत्येकवेळी अव्वल स्थान पटकावून मातापित्यांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान केले. ५० माणसांच्या एकत्र कुटुंबात अभ्यासासोबत शेतीचेही काम करतांना लाज बाळगली नाही. वाडीत विजेचा नेहमीच लपंडाव, शिक्षणासाठी जाण्यायेण्याची समस्या, रस्ता नाही अन पिण्याचे पाणीही नाही. यासह पावसाळ्यात तर मोठे मोठे ओहोळ ओलांडून जायला लागायचे. अशा बिकट परिस्थितीत डॉ. सखाराम सनू उघडे यांनी मिळवलेले दैदिप्यमान यश वाखाणण्याजोगे आहे.
समस्यांचा बाऊ न करता दुर्दम्य आशावाद धारण करून शैक्षणिक गगनभरारी घेणारे डॉ. सखाराम उघडे यांचा अभिमान वाटतो. ज्यांच्या पिढीत शाळा कशाला म्हणतात माहीत नाही अशा कुटुंबातील सामान्य विद्यार्थी यशवंत होऊ शकतो हे डॉ. उघडे यांनी सिद्ध केले आहे. इगतपुरी तालुक्याच्या वतीने आणि सह्याद्री आदिवासी ठाकूर-ठाकर समाज उन्नती मंडळाचा तालुका सचिव या नात्याने विशेष अभिनंदन.
- ॲड. मारुती आघाण, सरपंच खैरगाव
पुणे जिल्ह्यात मंचर येथील रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात वाणिज्य विभागाचे प्रमुख आणि सहाय्यक प्राध्यापक म्हणून डॉ. सखाराम उघडे काम पाहत आहेत. त्यांनी M.Com, Ph.D, SET, LLB, DTL, DLL&LW, GDCA, CHM आदी शिक्षण पूर्ण केलेले आहे. नुकतेच त्यांना वाणिज्य विषयासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत संशोधन मार्गदर्शक म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. त्यांनी व्यवसायाचे प्रशासकीय व्यवस्थापन विषय घेऊन डॉक्टरेट पदवी घेतली. शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळाच्या व्यवस्थापनाचा व संघटनेचा चिकित्सक अभ्यास ह्या शीर्षकाखाली त्यांनी प्रबंध पूर्ण केला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्यांना याबद्धल डॉक्टरेट दिली आहे. याकामी त्यांना डॉ. पी. बी. काळे, डॉ. पी. आर. बोत्रे आदींनी मार्गदर्शन केले. डॉ. सखाराम उघडे यांनी शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळ आणि आदिवासी विकास या विषयावर पुस्तक लेखन आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर 30 पेक्षा जास्त शोधनिबंध पेपर सादर केलेले आहेत. त्यांना आंतरराष्ट्रीय रोटरी क्लबने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. सामान्य आदिवासी कुटुंबातील डॉ. सखाराम उघडे यांनी घेतलेली भरारी उत्तुंग असून त्यांच्या यशाचे इगतपुरी तालुक्यात कौतुक करण्यात येत आहे.