“माजी झेडपी सदस्य” म्हणून आजपासून नवे प्रशासकीय पर्व सुरू : पालकमंत्री, खासदार, आमदार आणि जिल्हा नियोजन समितीचे महत्व वाढणार

इगतपुरीनामा न्यूज, दि. २०

अखेर आजपासून जिल्हा परिषदेवर प्रशासकीय राजवट सुरू झाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड ह्या प्रशासक म्हणून कामकाज पाहणार आहेत. जिल्ह्यातील पालकमंत्री, आमदार, खासदार आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य यांच्याशी सल्लामसलत करून प्रशासकीय कारभार हाकला जाणार आहे. विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आता “माजी” झाले आहेत. निवडणुका होऊन निवडून आलेल्या सदस्यांची पहिली बैठक होईपर्यंत प्रशासक राजवट अस्तित्वात असणार आहे. मधल्या काळात जनसंपर्क वाढवून पुन्हा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी हा काळ महत्वाचा मानला जातो. जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद सदस्यांनी मावळत्या कालावधीत काही विकासकामे मंजूर नसतानाही त्या कामांचे नारळ फोडले असल्याची चर्चा आहे. ही कामे प्रशासक काळात पूर्णत्वाकडे नेण्यासाठी संबंधित माजी सदस्यांना प्राधान्य द्यावे लागेल.

नाशिक जिल्हा परिषदेची पाच वर्षांची मुदत आज २० मार्चला संपली आहे. यासोबतच ५ वर्षांपूर्वी दणक्यात निवडून आलेल्या विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. आजपासून “माजी झेडपी सदस्य” अशी उपाधी सर्वांना मिळाली आहे. जनतेच्या विकासकामांची जबाबदारी प्रशासकांवर आली आहे. विविध विकासकामे करतांना प्रशासकाकडून जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार, आमदार, जिल्हा नियोजन समिती सदस्य यांचा सल्ला विचारात घेतला जात असतो. त्यानुसार ह्या कार्यकाळात ह्या सर्वांकडून सल्ला मसलत करून जनतेच्या विकासाची कामे मार्गी लावले जातील अशी अपेक्षा आहे. नव्या निवडणुका होईपर्यंत आगामी निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी अनेकांनी केलेली आहे. म्हणून जिल्ह्यातील काही सदस्यांनी कामे मंजूर नसतांना कामांचे भूमिपूजन केल्याचे ऐकिवात आहे. मधल्या काळात निवडणुकांची पूर्वतयारी करण्यासाठी संभाव्य इच्छुकांना मोठा कालावधी मिळाला असल्याने बरेच लोक ह्या कालावधीचा सुवर्णसंधी असल्याचे मानत आहेत.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!