आमदारकीसाठी इगतपुरी मतदारसंघात पक्षांतराचा जुना इतिहास : लोकसभा निवडणुकीपूर्वी होणार का पक्षांतरे ?

भास्कर सोनवणे । इगतपुरीनामा न्यूज : इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदार संघाचा संपूर्ण इतिहास बंडखोरी आणि पक्षांतरे यांच्याशिवाय कधी पूर्ण होऊ शकत नाही. एका पक्षाने मोठे केल्यानंतर त्या पक्षाला झुगारून दुसऱ्या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली जाण्याचा इथे इतिहास आहे. आमदारकी मिळवण्यासाठी असा आटापिटा ह्या मतदारसंघात बऱ्याचदा घडून आलेला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत बंडखोरी आणि पक्षांतराची स्थित्यंतरे मोठ्या प्रमाणावर घडण्याची शक्यता दिसून आलेली आहे. ह्यावेळी सर्वाधिक प्रमाणात पक्षांतरे आणि बंडाळ्या करून निवडणूक होईल अशी चिन्हे असली तरी सध्याच्या घडीला सगळं आलबेल आहे असं दिसतंय. आगामी विधानसभा निवडणुका काही महिन्यात येऊ घातल्या आहेत. तत्पूर्वी लोकसभा निवडणूक होणार आहे. ह्या दोन्ही निवडणुका राज्यातील दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी अशा परिस्थितीत इच्छुकांच्या अपेक्षा वाढवणाऱ्या आहेत. आगामी काळच या सगळ्या प्रश्नाचे उत्तरं देणारा ठरेल. लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षांतरे होतील अशी चर्चा मात्र सगळीकडे रंगली आहे.

पूर्वीपासून काँग्रेसच्या बाजूने झुकते माप देणारा इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदार संघ आहे. पक्षांतर करून पहिली निवडणूक लढवण्याचा मान तत्कालीन आमदार भाऊ सक्रु वाघ यांना जातो. 1980 मध्ये भाऊ वाघ यांनी काँग्रेस सोडून अर्स काँग्रेसमध्ये जाऊन पक्षांतर केले. तथापि त्यावेळी ते पराभूत झाले होते. 1985 मध्ये भाजपा सोडून अर्स काँग्रेसमध्ये शिवराम झोले यांनी प्रवेश केला. यानंतर पुलोदची उमेदवारी घेऊन ते विजयी आमदार ठरले. 1990 मध्ये भाजपाची कोणत्याही प्रकारची लाट नव्हती. ह्या मतदारसंघात भाजपाचे बळ अजिबात नव्हते. अशा परिस्थितीत काँग्रेसकडून मिळणारी उमेदवारी सोडून इंदिरा काँग्रेसमधून यादवराव बांबळे यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपाच्या कमळ चिन्हावर युतीचे उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढवली. भाजपाचे ह्या मतदारसंघातील पहिले आमदार होण्याचा बहुमान यादवराव बांबळे यांच्याकडे जातो. पुढे निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पुन्हा स्वगृही काँगेसमध्ये प्रवेश केला. मात्र त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी 1995 ला अपक्ष लढवली होती.1995 मध्ये अर्स काँग्रेसचे इंदिरा काँग्रेसमध्ये विलीनीकरण झाले. त्यावेळी शिवराम झोले यांनी इंदिरा काँग्रेसमध्ये प्रवेश करून आमदारकी मिळवली. 1999 मध्ये पांडुरंग बाबा गांगड यांनी शेतकरी कामगार पक्षातून शिवसेनेत जात शिवधनुष्य हाती धरले. शिवसेनेची उमेदवारी मिळवून ते युतीचे आमदार झाले. ह्याचवेळी शिवराम झोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची कास धरली होती. डाव्या आघाडीच्या तिकिटावर यापूर्वी निवडणूक लढून पराभूत झालेले काशीनाथ मेंगाळ यांनी 2004 ला मातोश्रीवरून शिवबंधन बांधून घेतले. शिवसेनेची उमेदवारी मिळवून ते तालुक्यातील सर्वात युवा आमदार म्हणून विजयी झाले. 2009 ला निवडणुकीच्या तोंडावर काशीनाथ मेंगाळ यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मेंगाळ यांनी प्रवेश करून तिकीट मिळवले. ह्याचवर्षी लोकनेते गोपाळराव गुळवे यांनी नाशिक मनपाच्या नगरसेविका आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांच्या कन्या निर्मला गावित यांना इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघात इंदिरा काँग्रेसचे तिकीट दिले. गावित यांनी मनसेचे उमेदवार काशीनाथ मेंगाळ यांचा पराभव करून स्थान भक्कम केले. पुढे 2014 मध्ये काशीनाथ मेंगाळ यांनी मनसेची साथ सोडून अपक्ष निवडणूक लढवली. यावेळीही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. ह्याचवर्षी शिवराम झोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला राम राम ठोकला आणि शिवसेनेचे धनुष्य हाती घेतले. निर्मला गावित यांनी त्यांचा पराभव केला. 2019 मध्ये निर्मला गावित यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवली मात्र त्या पराभूत झाल्या. मूळचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हिरामण खोसकर यांनी निर्मला गावित यांच्या पक्षांतरामुळे काँग्रेसमध्ये प्रवेश करून ते आमदार म्हणून निवडून आले. सध्या ते आमदार म्हणून कार्यरत आहेत.

Similar Posts

error: Content is protected !!