

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३० – सलाम मुंबई फाऊंडेशन, एव्हरेस्ट फाऊंडेशन व महाराष्ट्र शासनातर्फे उद्या मंगळवार ३१ जानेवारीला आंतरराज्यस्तरीय तृतीय एव्हरेस्ट बालपरिषद ऑनलाईन स्वरूपात होणार आहे. या बालपरिषदेसाठी इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम अवघड क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळेतील अंकुश ढवळू दरवडे या विद्यार्थ्याची निवड झाली आहे. अंकुशला या परिषदेत शिक्षण विभागाचे सहाय्यक संचालक यांच्याशी संवाद करण्याची संधी मिळाली आहे. ह्या परिषदेत आदिवासी विद्यार्थ्याला प्रथमच संवाद साधण्याची मोठी संधी लाभली आहे. शिक्षक संजय येशी यांनी अंकुश याला मार्गदर्शन केल्याबद्दल गावकऱ्यांनी आभार मानले आहेत.
या परिषदेत महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश राज्यातील २७५ विद्यार्थी आणि १०० शिक्षक सहभागी होणार आहेत. नाशिकचे शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्या हस्ते ऑनलाइन स्वरूपात उदघाटन होईल. मध्यप्रदेश आरोग्य विभागाचे उपसंचालक उपेंद्र धोटे, नाशिकचे सहाय्यक आयुक्त गणेश परळीकर, नाशिक शिक्षण विभागाचे सहाय्यक संचालक पुष्पावती पाटील, गुजरात वागरा येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण कुमार सिंग, महाराष्ट्र राज्यस्तरीय कार्यक्रम अधिकारी गणेश सोनुले, मध्यप्रदेश विजय राघवगडचे गटशिक्षणाधिकारी ए. के कोरी, सलाम मुंबई फाऊंडेशनचे सहाय्यक महाप्रबंधक दीपक पाटील सहभागी होणार आहेत.