लोककलेतून यशोगाथांची वारी, पोहोचली वंचितांच्या घरोघरी :
जनजागृती मोहिमेला जिल्ह्यात मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

इगतपुरीनामा न्यूज, दि. 16

गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या कठीण काळातही जनसेवेचे कर्तव्य अखंडपणे निभावणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या दोन वर्ष पूर्तीनिमित्त लोककलेच्या माध्यमातून जनजागृतीच्या उपक्रमास  जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हा माहिती कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, माहिती व जनसंपर्क महासंचालयाच्या नाशिक जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने महाविकास आघाडी शासनाच्या दोन वर्ष पूर्तीनिमित्त जिल्ह्यातील १५ तालुक्यांत ही मोहिम राबविण्यात आली.

जिल्ह्याच्या शासनमान्य यादीवरील उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या आनंद-तरंग फाउंडेशन, वाघेरे, इगतपुरी, नटराज लोककला अकादमी, इगतपुरी व चाणक्य कला मंच, या तीन संस्थांची या उपक्रमासाठी निवड करण्यात आली होती. या तीन संस्थांमधील ३० कलावंतांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला. जिल्ह्यातील १५ तालुक्यातील ६३ गर्दीच्या, गजबजलेल्या ठिकाणांवर कोरोना नियमांचे, निर्बंधांचे पालन करून हे कार्यक्रम करण्यात आले. भारूड, किर्तन, पोवाडा, लोकगीत, पथनाट्य, लोकनाट्याच्या स्वरूपात शासकीय योजनांची माहिती व यशोगाथांची ही लोककलेची वारी तळागाळतील सर्वसामान्य लोकांना भावली असल्याचेही जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

प्रथमच जिओ टॅगिंगचा उपयोग
जिल्हाभरात झालेल्या या लोककलेच्या कार्यक्रमांच्या मुल्यमापन व रिपोर्टींगसाठी जेथे कार्यक्रम सादर केला तेथील छायाचित्रे वेळोवेळी अपडेट्स करण्याच्या सूचना सर्व कलापथकांना देण्यात आल्या होत्या. परंतु त्यात अधिक पारदर्शकता यावी यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून प्रत्येक कार्यक्रमाचे रिपोर्टिंग जिओ टॅगिंगसह असलेल्या छायाचित्र व व्हिडिओद्वारे करण्यात आले. त्यास सर्व कला पथकांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिला असून खरोखरच त्या ठिकाणी कार्यक्रम होतोय किंवा झाला हे त्यामुळे लक्षात येते. लोककलावंतांनाही कार्यक्रम सादर केला त्यासाठी एकापेक्षा अधिका प्रमाणपत्रे पूर्वी घ्यावी लागत होती. परंतु जिओ टॅगिंग मुळे आता केवळ एकच प्रमाणपत्र व जिओ टॅगिंग ची छायाचित्रे द्यावी लागतात. त्यामुळे लोककलावंतांनाही प्रमाणपत्रासाठी अनावश्यक विनवण्या, फेऱ्या मारण्याच्या त्रासातून सुटका मिळाली असून अनावश्यक कामासाठी जाणारी ही उर्जा लोककलापथके आता प्रामाणिकपणे सादरीकरणासाठी वावरताना दिसतात, असेही जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मोहिमेतून १५ तालुक्यांतील ६३ गावामध्ये हा कार्यक्रम झाले त्यात
नाशिक तालुका : बी. डी. भालेकर मैदान, नाशिक, मखमलाबाद गाव बस स्टॅन्ड, कृषी उत्पन्न  बाजार समिती, नाशिक, परफेक्ट मार्केट, नांदूर नाका, रामसेतू पूल
निफाड तालुका : सायखेडा चौफुली, ग्रामपालिका, रामाचे पिंपळस, छत्रपती शिवाजी महाराज चौक, निफाड, ग्रामपंचायत कार्यालयासमोर, नैताळे
येवला तालुका : गणपती मंदिरासमोर, देशमाने, ग्रामपंचायत कार्यालय परिसर, मुखेड, बाजारपेठ परिसर, जळगाव नेऊर, न्यु इंग्लिश स्कुल, नगरसुल.
नांदगाव तालुका : कृषी उत्पन्न बाजार समिती, नांदगाव, ज्ञानेश्वर माऊली मंदिर परिसर, हिसवळ बु., भगवान बाबा मंदिर परिसर, पाणेवाडी, नागापूर बस स्टॅन्ड
चांदवड तालुका : दुगाव, वडाळी भोई, चांदवड रेणूका माता देवस्थान, वडनेर भैरव.
मालेगाव तालुका : मालेगाव महानगर पालिकेच्या कॉलेजचे मैदान, मालेगाव बस स्थानक, दाभाडी, वजीर खेडे, काष्टी
बागलाण ( सटाणा ) तालुका : सटाणा नगरपरिषद आवार, मुंजवड, डाऱ्हाने, ठेंगोडे
मनमाड तालुका: मनमाड तालुक्यातील बुद्ध विहार, वंजारवाडी ग्राम पंचायत, कऱ्हा ग्राम पंचायत, सटाने ग्राम पंचायत
सिन्नर तालुका : जामगाव, मनेगाव, डुबेरे, मुसळगाव
कळवण तालुका: मानूर, अभोणा, कनाशी, दळवट
पेठ तालुका: ग्रामीण आरोग्य केंद्र पेठ, कोहरगाव बाजारपेठ, करंजाळी, व इमानबारी
सुरगाणा तालुका : घागबारी गाव, होळी चौक सुरगाणा, बुबळी व बोरगाव
इगतपुरी तालुका : वाडिवऱ्हे, घोटी, मुंडेगाव व इगतपुरी बाजारपेठ
दिंडोरी तालुका : दिंडोरी, भनवड आठवडे बाजार, मोहाडी व जानोरी
त्र्यंबकेश्वर तालुका : हरसुल, ठाणापाडा, वेळुंजे, गणेशगाव व घुमोडी

ग्रामीण भागात लोककलेतून केलेले सादरीकरण हे भावणारे आहे
दो नवर्षांच्या कोरोना काळात वंचित असलेल्या लोककलावंतांना शासनाच्या या जनजागृती मोहिमेच्या माध्यमातून नवसंजीवनी मिळाली आहे.  लोककलावंतांना शासनाच्या विकास कामांची माहिती गावपाड्यापर्यंत पोहचविण्याची संधी लोककलावंतांना देऊन शासनाने खूप मोठा आधार दिला असून आमच्यासाठी रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. शासनामार्फत असे वारंवार कार्यक्रम घेण्यात यावेत. आजही ग्रामीण भागात लोककलेतून केलेले सादरीकरण हे भावणारे आहे. गावात गावात आमच्या सादरीकरणाच्या कलेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. काही नागरिकांनी आमच्या कलेला बक्षीस दिले, तर काही ठिकाणी आमच्या सादरीकरणासाठी आमचा सन्मान करण्यात आला. शासनाने लोककलावंतांना दिलेल्या संधीमुळे खऱ्या अर्थाने ‘आपला महाराष्ट्र, आपलं सरकार’ ही जाणीव होत आहे.आम्हा कलावंतांवर सोपवलेली जबाबदारी आम्ही नित्यनियमाने पार पाडू पुनःश्च शासनाचे आभार
शाहीर उत्तम गायकर, आनंदतरंग फाउंडेशन, वाघेरे, इगतपुरी

लोकांचा प्रतिसाद आमच्यासाठी शाबासकीची थाप
जनकल्याणकरी योजनांचा जागर करत असतांना लोकांचा भरभरून मिळालेला प्रतिसाद जणूकाही आमच्यासाठी शाबासकीची थापचं होती. गावं, शहरातून  सादरीकरण करतांना लोकांनी आमचा केलेला सत्कार हा खऱ्या अर्थाने शासनाचा होता. हे शासन तुम्हा, आम्हा सर्व सामान्य जनतेचे  आहे, हे दोन वर्षातील जनसेवेसाठी केलेल्या कामातून दिसून आले. जनकल्याणासाठी मोलाची कामगिरी आम्हाला दिली त्यासाठी महाविकास आघाडी शासनाचे मी व माझे सर्व सहकारी कलावंत आभार मानतो.
– शाहिर बाळासाहेब भगत, नटराज लोककला अकादमी इगतपुरी

कोरोना काळात कलापथकांचे थांबलेले काम सुरू झाले
शासनाच्या योजनांची माहिती जनसामान्यापर्यंत पोहचवितांना मनस्वी आनंद वाटला.  शासनाच्या या उपक्रमातून  कोरोना काळात कलापथकांचे थांबलेले काम सुरू होऊन रोजगार उपलब्ध झाला. भविष्यातही असे उपक्रम राबवून कलापथकांना उभारी द्यावी हिच नम्र अपेक्षा करतो.
– डॉ. राजेश साळुंखे, चाणक्य कलामंच, नाशिक

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!