इगतपुरीनामा न्यूज, दि. १५
महाराष्ट्रातून अधिक प्रशासकीय अधिकारी तयार होण्यासाठी ‘करिअर कट्टा’चा उपयोग होईल. ह्याचा उपयोग अधिकाधिक जिज्ञासू विद्यार्थिनींना होईल. विद्यार्थिनींनी विविध स्पर्धा परीक्षांसाठी ह्या मार्गदर्शन केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन
प्राचार्या व संस्थेच्या एचआर डायरेक्टर दीप्ती देशपांडे यांनी केले. नाशिक येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एसएमआरके महिला महाविद्यालयात आज ‘करिअर कट्टा’ ह्या उपक्रमाचे उदघाटन सौ. देशपांडे यांच्या हस्ते झाले. उदघाटनप्रसंगी त्या पुढे म्हणाल्या की, सावित्री स्पर्धा परीक्षा केंद्रामार्फत विद्यार्थिनींना मार्गदर्शन मिळत होते. करिअर कट्टामुळे एक नवा आयाम स्पर्धा परीक्षा केंदाला प्राप्त झाला आहे.
महागष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र ह्यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम प्रत्येक महाविद्यालयात राबविला जाणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. सतीश धनावडे ह्यांनी केले. त्यांनी विद्यार्थी हा केंद्रबिंदु नजरे समोर ठेवून आकारास येत असलेला हा उपक्रम आहे असे सांगितले. ह्या उपक्रमाचा उद्देश उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना समान पातळीवर मार्गदर्शनाची संधी मिळावी हा आहे. वर्षातील ३६५ दिवस चालणाऱ्या ह्या उपक्रमात देशातील आयएएस अधिकारी व प्रसिद्ध उद्योजक ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन करणार आहेत. सूत्रसंचालन संगणक विभाग प्रमुख प्रा. मनिषा जोशी ह्यांनी, प्रा. तृप्ती ढोका ह्यांनी उपस्थितांचे आभार मानले. उपप्राचार्या डॉ. कविता पाटील, डॉ. नीलम बोकिल, प्राध्यापक, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.