इगतपुरीनामा न्यूज, दि. 17
“समाजातील दुष्प्रवृत्तींचं होळीत दहन होऊ दे, सत्प्रवृत्तींची ज्योत सर्वांच्या हृदयात तेवत राहू दे,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील नागरिकांना होळी व धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. होळीचा सण साजरा करताना समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांनाही आपल्या आनंदात सहभागी करुन घ्या. वृक्षतोड न करता पर्यावरणपूरक होळी साजरी करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार शुभेच्छा संदेशात म्हणाले की, महाराष्ट्राच्या गावखेड्यात, विशेषत: कोकणात साजरा होणारा होळीचा सण यंदाही आनंदात, उत्साहात साजरा होऊ दे. समाजातील अज्ञान, अस्वच्छता, अनिष्ठ रुढी, परंपरांचा विनाश होऊ दे. राज्यातल्या घराघरात, मनामनात ज्ञानाचा प्रकाश उजळू दे. होळी व धुलीवंदन साजरी करताना पाण्याचा अपव्यय टाळावा, नैसर्गिक रंगाचा वापर करावा. डोळे व त्वचेला इजा होणार नाही, याची काळजी घ्यावी. कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करुन सुरक्षित होळी साजरी करा, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.