काँग्रेस संपली हे दिवास्वप्न !

– पुरुषोत्तम आवारे पाटील, दै. अजिंक्य भारत, अकोला

पाच राज्यांच्या निवडणुकांचा नुकताच जो निकाल लागला त्यात काँग्रेसचा जो सफाया झाला त्यामुळे काँग्रेसी चिंतेत तर इतर पक्ष मोठ्या आनंदात आहेत. भाजपच्या तर अगदी गाव पाळीवरील कार्यकर्त्याला काँग्रेसमुक्त भारत झाल्याचे दिवसा भास होत आहेत. इंदिरा गांधींच्या पराभवानंतर काँग्रेसचा चढउतार ज्यांनी अभ्यासला असेल त्यांना या पडझडीचे काहीही वाटत नसेल कारण काँग्रेस वरवर गांधी, नेहरू घराण्याचा पक्ष वाटत असला तरी तो मुळात तसा नाही. काँग्रेस हा शेवटच्या स्तरातील व्यक्तींचा माणूस म्हणून विचार करणारा पक्ष आहे. देशातील लोकांच्या मेंदूत आजही तो पक्ष म्हणून नव्हे तर विचार म्हणून रुजलेला आहे. तो कुण्या जय किंवा पराजयाने संपणार असे वाटत नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी निराश वा विरोधकांनी उन्मादी होण्याची गरज नाही हे लक्षात घ्यायला हवे.

आजच्या काँग्रेस पक्षाला नव्याने कात टाकण्याची गरज नक्कीच आहे. ज्या गोष्टी पूर्वी संघटनेत होत्या त्या पुन्हा आणण्याची गरज आहे तर काहींना ठरवून नारळ देण्याची गरज आहे. स्वातंत्र्योत्तर काळात किंवा नेहरूंच्या नंतरच्या काळात केडर नावाचा प्रकार काँग्रेसमध्ये खूप झपाट्याने कमी होत गेला. काहीतरी निश्चित अशी पक्की बांधलेली विचारप्रणाली अलीकडे आढळत नसल्यामुळे काँग्रेसमध्ये केडरला मर्यादा येतेच. मग राहतं काय ? तर हितसंबंधांचं, नात्यागोत्यांचं, घराणेशाहीचं राजकारण आणि संस्थात्मक जाळं. त्यातही गंमत अशी की, स्वातंत्र्यपूर्व काळातील कर्तबगारीच्या बळावर सर्वत्र व दीर्घकाळ काँग्रेसला सत्ता मिळत गेली. म्हणजे स्वातंत्र्योत्तर तीस वर्षं काँग्रेसला शह द्यायला प्रबळ म्हणावे असे पक्ष नव्हते. त्यामुळे काँग्रेसचे सर्व रथी महारथी आणि धुरीण आपल्याला अशाप्रकारे केडर बांधायची गरज आहे, हेच मानायला तयार नव्हते. नवी पिढी घडवली पाहिजे असंही ते मानत नव्हते. सत्तेच्या माध्यमातून हे सगळं आपोआप घडत जाईल, असं त्यांचं म्हणणं होतं आणि हे बराच काळ चाललं. म्हणून तर जवळपास 90 च्या दशकापर्यंत एक मोठा काळ असा होता की, लोकांना काँग्रेसचा वीट आलेला होता, कंटाळा आलेला होता, नको तितका तिरस्कार वाटत होता, राग येत होता आणि तरीही लोक काँग्रेसला पुन्हा पुन्हा निवडून देत होते.

आज हयात असलेल्या दोन – तीन पिढ्यांनी स्वतःच्या लहानपणापासून काँग्रेसचं वर्तन पाहिलेलं आहे आणि त्यांच्या मनात काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वापेक्षासुद्धा स्थानिक पातळीवरच्या नेतृत्वाबद्दलचा राग खूप जास्त आहे. स्थानिक पातळीवरचे काँग्रेसचे सगळे नेते म्हणजे गावोगावचे सुभेदार आहेत, हे सर्व पाटीलकी करणारे आहेत, देशमुखी करणारे आहेत, साखर कारखाने सांभाळणारे आहेत, शिक्षण सम्राट आहेत, छोटे मोठे उद्योग वा संस्था सांभाळणारे आहेत; आणि यांपैकी काहीच नसतील तर दलाल म्हणून काम करणारे आहेत. या सगळ्या काँग्रेसजनांचा तळागाळातल्या लोकांशी खूप संबंध येतो. आणि जनता या सर्वांना विटलेली आहे. कित्येकदा असं दिसतं की, जनतेला केंद्रातील इंदिरा, राजीव, सोनिया, राहुल यांच्या घराणेशाहीचा फारसा राग येत नाही,
पण सभोवतालच्या तालुका व जिल्हा स्तरावरील घराणेशाहीचा खूप राग येतो. त्यामुळे काँग्रेसमधले वरचे लोक कितीही सभ्य असतील किंवा त्यांचा फार कुणाला राग वाटत नसेल तरी खालच्या स्तरावर जे दिसतं आहे, त्याचं प्रतिबिंब वरच्या स्तरावरही पडतं आणि मग केंद्रातील घराणेशाहीमुळे आणि त्यांच्या निष्ठावान वा खुशमस्कर्‍यांमुळे स्थानिक नेते मोठं स्वप्न बघू शकत नाहीत असं परसेप्शन जनतेच्या मनात तयार होत असावं. सर्वत्र पडझड होत असताना जे स्थानिक नेते सुतकी चेहरे करून फिरतात त्यांनी आपल्या भागात पक्षासाठी काय केले ? हा मोठा प्रश्न आहे. हे नेते राहुल, प्रियंका यांच्या पोस्ट शेयर करण्यापलीकडे काही करीत नाहीत. पैसा सोडा शारीरिक श्रम आणि वेळही देण्याची यांची तयारी नसते. काल काय झाले हे विसरून गावोगावचा काँग्रेस शिपाई कामाला लागला तर काँग्रेस नव्या जोमाने बहरेल हे लक्षात घ्या.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!