प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. १३
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याकडे नोंद केलेल्या शेतकऱ्यांचे ऊस प्राधान्याने घेतले जातील. नोंद नसलेल्या शेतकऱ्यांच्या उसाबाबतही नक्की विचार केला जाणार असल्याचे सकारात्मक आश्वासन महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस नेते संदीप गुळवे व काँग्रेस तालुकाध्यक्ष रमेश जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला दिले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
इगतपुरी तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या ऊसाची अद्याप तोड झाली नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. याबाबत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस नेते संदीप गुळवे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली माजी सभापती गोपाळ लहांगे, पाडळी देशमुखचे माजी सरपंच जयराम धांडे गोंदे दुमालाचे कारभारी नाठे, सुरेश धोंगडे, बाळासाहेब ढोबळे आदींच्या शिष्टमंडळाने आज महसूलमंत्री ना.।बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कैफियत मांडुन लवकरात लवकर उसाची तोड होणे गरजेचे असल्याचे निवेदन केले. यावर ना. थोरात यांनी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याकडे ऊसाची नोंद केलेल्या शेतकऱ्यांचे ऊस प्राधान्याने घेतले जातील.नोंद नसलेल्या शेतकऱ्यांच्या उसाबाबतही नक्की विचार केला जाणार असल्याचे आश्वासन दिले.