घोटीच्या मातोश्री हॉस्पिटलमध्ये इगतपुरी तालुक्यातील पहिली ब्रेन ट्युमर शस्त्रक्रिया यशस्वी : आदिवासी तालुका आता आरोग्य क्षेत्रातही आघाडीवर असल्याचे सिद्ध

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १३

इगतपुरी ह्या आदिवासी बहुसंख्य तालुक्यात वैद्यकीय सोयीसुविधांची वानवा असल्याची हाकाटी सगळीकडे पिटली जाते. त्यामुळे गंभीर आजारांचा उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यासाठी मुंबई, नाशिकला प्राधान्य दिले जाते. असे समज गैरसमज असले तरी त्यांना खोडून टाकण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील मातोश्री हॉस्पिटल आघाडीवर आहे. ह्या हॉस्पिटलच्या सहयोगाने इगतपुरी तालुक्याच्या इतिहासात आज अतिशय महत्वपूर्ण घटना घडली आहे. ह्या घटनेमुळे इगतपुरी तालुका सुद्धा अवघड शस्त्रक्रिया पार पाडू शकतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. इगतपुरी तालुक्याच्या इतिहासातील पहिली ब्रेन ट्यूमरची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. घोटीच्या मातोश्री हॉस्पिटलमध्ये ही अवघड शस्त्रक्रिया
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेद्वारे करण्यात आली आहे. आरोग्य आणि विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी मातोश्री हॉस्पिटलचे विशेष अभिनंदन केले आहे.

कुर्णोली ता. इगतपुरी येथील ४० वर्षीय सरुबाई तेलम यांना गेल्या 2 वर्षापासून डोकेदुखी, चक्कर येणे यासह तोल सांभाळता येत नव्हता. त्यांनी विविध ठिकाणी उपचार घेतले. मात्र आजाराचे निदान मात्र होत नव्हते. घोटी येथील मातोश्री हॉस्पिटलचे डॉ. हेमलता चोरडिया, डॉ. जितेंद्र चोरडिया यांच्याकडे त्या तपासणी करायला आल्या. डॉक्टरांनी त्यांच्या आजाराबाबत सर्वांगीण माहिती घेऊन विविध तपासण्या करून घेतल्या. यामध्ये त्यांना Maningioma झाल्याचे स्पष्ट झाले. हा एक प्रकारचा कॅन्सर असून जो मेंदू मध्ये आपोआप तयार होतो. ज्या बाजूला गाठ असते त्याचा विरुद्ध बाजूची ताकद कमी होते. यामुळे ब्रेन ट्युमर शस्त्रकिया करणे आवश्यक होते. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या साहाय्याने मोफत शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला गेला. शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध मेंदूरोगतज्ञ डॉ. अनिल जाधव यांनी मोलाची भूमिका बजावली. भुलतज्ज्ञ डॉ. संजय वलवे यांनी त्यांना साहाय्य केले. मातोश्री हॉस्पिटलचे डॉ. हेमलता चोरडिया, डॉ. जितेंद्र चोरडिया यांनी संपूर्ण व्यवस्थापन करण्यात करून शस्त्रक्रिया यशस्वी केली. इगतपुरी तालुक्यातील ही पहिली आणि यशस्वी शस्त्रक्रिया असून संबंधित रुग्ण आता रोगमुक्त झाल्याने सर्वांनी जल्लोष केला.

ह्या कामासाठी सर्व औषधीचा पुरवठा वेळेवर उपलब्ध करून देण्यात महत्वाची भूमिका सिद्धी मेडिकलचे संचालक कुमार चोरडिया यांनी बजावली. हॉस्पिटलमधील कर्मचारी मनीषा शिंदे, दीपाली धादवड, मोनिका पगारे यांनीही परिश्रम घेतले. जीवनदायी योजनेचे अधिकारी डॉ. तुषार मोरे, कुलदीप क्षीरपूरकर, राहुल सोनवणे, समकीत साखला, पंकज दाभाडे यांनीही आपले योगदान दिले. रक्ताच्या २ बाटल्या, ४ प्लाझ्मा उपलब्ध करण्यासाठी हरिष मुंगसे यांची मदत झाली. इगतपुरी तालुक्याच्या आरोग्य क्षेत्रात ह्या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे मातोश्री हॉस्पिटलचे विशेष कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!