गोंदे दुमाला येथे ८ वर्षीय बालिकेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

इगतपुरीनामा न्यूज, दि. २४

इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथे चहा प्यायला थांबलेल्या परिवारातील ८ वर्षीय बालिकेला विजेचा धक्का बसल्याने तिचा मृत्यू झाला. ठाणे येथील कळवा या भागातील ही बालिका असून तिच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. ह्या घटनेबाबत नरेन्द्राचार्य संस्थानच्या रुग्णवाहिकेचे रुग्णवाहक रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांना माहिती समजताच त्यांनी बालिकेला तातडीने नाशिकच्या जिल्हा  रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू करताना बालिकेचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

याबाबत अधिक माहिती अशी की, कळवा येथील किरण थोरात हे पत्नी पुष्पा किरण थोरात आणि इतर ५ लोकांसह विवाह सोहळ्यासाठी इगतपुरी तालुक्यात आले होते. आज सकाळी १२ च्या सुमारास गोंदे दुमाला येथे सर्वजण चहा पिण्यास थांबले. यावेळी कु. सायली किरण थोरात ही ८ वर्षीय बालिका एका विजेच्या खांबाजवळ गेली. खांबामध्ये वीज प्रवाह असल्याने तिला विजेचा तीव्र धक्का बसला. ती ओरडल्याने सर्वांचे लक्ष गेले. माजी उपरपंच कमलाकर नाठे यांनी तातडीने नरेन्द्राचार्य संस्थान मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णवाहक रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांना माहिती दिली. त्यांनी लगेच दाखल होऊन सायली थोरात हिला नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू करत असतांना बालिकेची प्राणज्योत मालवल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. बालिकेचा मृत्यूमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे. वाडीवऱ्हे पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून तपास कार्य सुरू केले आहे.