प्रभाकर आवारी, इगतपुरीनामा न्यूज, दि. ४
नाशिक मुंबई महामार्गावरील पाडळी फाटा येथे शालेय विद्यार्थी, प्रवासी, वाहनधारक यांच्यासाठी रस्ता ओलांडणे सोयीचे व्हावे. अपघात टळावे यासाठी भुयारी मार्ग तयार केलेला आहे. मात्र ह्या भुयारी मार्गात साचणारे पाणी निघण्यासाठी यंत्रणेने उपाययोजना न केल्याने या भुयारी मार्गात बारमाही पाणीच साचुन राहत असते. त्यामुळे या मार्गाचा वापर होत नसुन हा भुयारी मार्ग केवळ शोभेची वास्तु बनला आहे. पर्यायाने रस्ता ओलांडण्यासाठी महामार्गावरूनच जावे लागत असल्याने अनेक अपघात घडत आहेत. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण व घोटी टोल प्रशासनाला याबाबत अनेकदा लेखी कळवुनही याकडे यंत्रणा डोळेझाक करीत आहे. यावर त्वरित उपाययोजना करावी अन्यथा १० नोव्हेंबरला इगतपुरी तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा पाडळी देशमुखचे उपसरपंच बाळासाहेब आमले यांनी दिला आहे.
महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु असतांना नागरिकांची मागणी असतांनाही भुयारी मार्ग न करताच महामार्गाचे काम करण्यात आले होते. २००७ मध्ये वाहतुक सुरु झाल्यानंतर भुयारी मार्गासाठी शेणवड खुर्दचे माजी सरपंच हेमंत झोले यांनी शालेय विद्यार्थ्यांसह महामार्गावर रास्ता रोको केला होता याची दखल घेऊन राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणं विभागाने येथे भुयारी मार्ग तर तयार केला. मात्र या भुयारी मार्गातील पाण्याचा विसर्ग होण्यासाठी व्यवस्थाच न केल्याने येथे बारमाही पाणी तुंबलेले राहते. परिणामी शालेय विद्यार्थी, प्रवासी व वाहनधारक रस्ता ओलांडण्यासाठी महामार्गाचाच वापर करत आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असुन सदर भुयारी मार्ग सध्या वापरात नसून अडचण आणि खोळंबा झाला आहे. यंत्रणेला याबाबत ह्या भुयारीमार्गातील पाण्याचा विसर्ग होण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याबाबत, या ठिकाणी गतिरोधक व आवश्यक सुचना फलक लावावेत अशा मागण्यांचे पाडळी देशमुखचे सरपंच खंडेराव धांडे, उपसरपंच बाळासाहेब आमले यांच्यासह ग्रामस्थांनी अनेकदा निवेदने दिली. घोटी टोल प्रशासन व भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाने यावर अद्यापही उपाययोजना न केल्याने येथे बारमाही पाणी साचलेले राहत असुन पर्यायाने रस्ता ओलांडण्यासाठी शालेय विद्यार्थी, प्रवासी व वाहनधारकांना महामार्गावरूनच ये जा करावी लागत असुन अनेक अपघातांचे प्रमाण या ठिकाणी वाढले आहे.
नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना याबाबत लक्षात आणुन दिल्यानंतर त्यांनी सदर भुयारी मार्गाची स्वतः पाहणी केली. त्याच जागेवरून यंत्रणेला सुचना करूनही यावर उपाययोजना करण्यात आली नाही. यावर तात्काळ कार्यवाही करून भुयारी मार्गातील पाण्याचा निचरा करावा, येथे हायमास्ट लावावे तसेच आवश्यक सुचना फलक लावुन महामार्गावर गतिरोधक बसवावे या मागणीसाठी पाडळी देशमुखचे उपसरपंच बाळासाहेब आमले हे १० नोव्हेंबरला इगतपुरी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहेत. याबाबत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाचे व्यवस्थापक, इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे, खासदार हेमंत गोडसे यांना निवेदन दिले आहे. निवेदनाची तात्काळ दखल न घेतल्यास शालेय विद्यार्थ्यांसमवेत उपोषण करणार असल्याचे उपसरपंच बाळासाहेब आमले यांनी सांगितले आहे. निवेदनावर बाळासाहेब आमले, दिलीप धांडे, सोमनाथ चारस्कर, लक्ष्मण धांडे, अनिल धांडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
पाडळी फाटा येथील भुयारी मार्गातील पाणी बाहेर निघण्यासाठी कोणतीही सोय केली नाही. येथे बाराही महिने पाणी साचलेलेच असते. यामुळे शालेय विद्यार्थी, प्रवासी व वाहनधारकांना महामार्ग ओलांडावा लागतो. याबाबत सरपंच खंडेराव धांडे व आम्ही अनेकदा टोल प्रशासनाकडे मागणी करूनही याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे १० नोव्हेंबरला आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- बाळासाहेब आमले, उपसरपंच पाडळी देशमुख