इगतपुरीनामा न्यूज (विशेष प्रतिनिधी) :
इगतपुरी दि. ३ : ग्रामीण भागासह शहरी भागातसुध्दा सर्वसामान्यपणे १३ ते १५ वयोगटातील मुले तंबाखूच्या आहारी जाऊ नये म्हणून राज्यभरात गेल्या काही वर्षांपासुन ‘तंबाखूमुक्त शाळा’ हा उपक्रम राबविला जात आहे. आता काही भागात शाळा सुरू अथवा बंद असल्या तरी या उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी तसेच शैक्षणिक संस्थेने विद्यार्थी, कर्मचाऱ्यांमधून तंबाखू निरिक्षकाची नियुक्ती करावी, अशा सूचना शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
तंबाखू सेवनाने आरोग्यावर विपरित परिणाम होत असून तंबाखू हा कर्करोग, मधुमेह, हृदयरोग यांसारख्या आजारासाठी प्रमुख कारणीभूत घटक मानला जातो. ग्लोबल युथ सर्वेनुसार भारतात १३ ते १५ वयोगटातील १४.६ टक्के विद्यार्थी तंबाखू सेवनाच्या आहारी गेलेले आहेत. विद्यार्थ्यांना तंबाखूपासून दूर ठेवणे तसेच तंबाखूची सवय जडलेल्या विद्यार्थ्यांना तंबाखूच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था धोरण – २०२० अंतर्गत नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार नाशिक जिल्हयासह राज्यातील शैक्षणिक संस्थांना यापुढे संस्थेच्या परिसरात तंबाखुमुक्त क्षेत्राचा फलक सक्तीने लावावा लागणार आहे.
◆काय आहे तंबाखूचे वास्तव : तंबाखू कंपन्यांच्या चक्रव्यूहातून युवकांना बाहेर काढून तरुणांना तंबाखू व निकोटीन वापरण्यापासून प्रतिबंधित करणे ही या वर्षाची जागतिक आरोग्य संघटनेची मुख्य संकल्पना आहे. अनेक दशकांपासून तंबाखू उद्योग समूह तंबाखू आणि निकोटीन उत्पादनाकडे तरुणांना आकर्षित करण्यासाठी हेतूपूर्वक वेगवेगळी आणि आक्रमक रणनीती अंगीकारुन नवीन पिढीला तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्याकरिता आकर्षित करीत आहे.
लहान वयात मुलांना तंबाखूजन्य पदार्थांची सवय लागावी यासाठी वेगवेगळ्या जाहिरातींच्या द्वारे तंबाखू उद्योग समुहाकडून मुलांना तंबाखू सेवनाकडे आकर्षित केले जात आहे. याचाच परिणाम म्हणून भारतामध्ये ५ हजार ५०० युवक दरदिवशी पहिल्यांदा तंबाखूचे सेवन करतात. दरदिवशी भारत देशात ३ हजार ५०० लोक केवळ तंबाखू सेवन केल्याने मरण पावतात, असे एका सर्वेक्षणातुन समोर आले आहे.
https://chat.whatsapp.com/BH7oxqqAwamKNTaLeBCZxY
ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा!