इच्छाशक्तीमुळे कोरोनावर विजय शक्य

भगवान सोनवणे
संपादक – दैनिक आवाज
9545910177

सर्वत्र कोरोनाने हाहा:कार माजवलाय...!! हो ना? पण खरं सांगू? आपण वर्षापासून ज्या भीतीने जगता आहात त्याचंच नाव 'कोरोना'आहे असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही! काय आहे नक्की कोरोना? कुठलंही ठाम औषध यावर उपलब्ध नसतांनाही कसा माणूस बरा होतोय? प्रश्न तर प्रत्येकाला पडतच आहे! वर्षभराचा विचार केल्यास अगदी सकाळच्या नाष्ट्यापासून तर संध्याकाळच्या जेवणापर्यंत (जे इच्छा असूनही अनेकांना नकोसे वाटतंय) विषय फक्त आणि फक्त कोरोना!! मित्रांनो आपण ऐकलंय कि पूर्वी महामारी आली होती की त्यात अक्षरशः प्रेताची अंत्यविधी सुद्धा करणे शक्य होत नव्हते अन एक गेला की दुसरा! दुसरा गेला की तिसरा! अशी परिस्थिती निर्माण झाल्याने प्रेताची अंत्यविधी म्हणजे 'विहीर'! हो विहीर!जो गेला की त्याला फक्त त्या विहिरीत टाकून द्यायचे अन विहीर भरली कि ती विहीर मातीने पुरून द्यायची!! अहो, त्याही संकटाशी आपले पूर्वज लढले अन त्यावर विजय मिळविण्यात यशस्वी देखील झाले! मग का ? खरंच मी म्हणतो का?आपण सर्वांनी एवढी भीती या कोरोना बद्दल आपल्या मनात घालून ठेवली आहे!आजार आहे... संसर्गजन्य देखील आहे पण ?......पण.....?आपण त्यासोबत लढू शकतो हेच आपले मन विसरलंय!! असे झालंय! साधी कल्पना करा की तुमचं डोकं दुखतंय (डोकं दुखत नसताना)! बघा पुढील 5/10 मिनिटात तुमचे डोकं दुखू लागणार यात तीळमात्र शंका नाही! "जसे जे जे भासे,ते स्वप्नी दिसे" या उक्तीप्रमाणे!!आपण दिवसभरात जो विचार करू तो तुम्हाला रात्री गाढ झोपी गेले असताना स्वप्नात येणारच असा अनेकांचा अनुभव असणार! (फक्त खऱ्या मनाने स्वीकारा) झालं तेच आहे! साधी सर्दी झाली अन तुम्ही कोठे शिंकला तर आजूबाजूला असणाऱ्यांपैकी ज्याची शारीरिक क्षमता नसेल त्याला सर्दी होणारच! म्हणून सर्दी झालेला माणूस मरणार का हो? अगदी तसेच कोरोनाचे लक्षणे अभ्यासली अन त्याचा विचार केला तर संसर्गजन्य आहे...शारीरिक क्षमता नसेल तर तो होणारही! पण मग झाला म्हणजे मरणारच...असे नाही हे लक्षात घ्या!महत्वाचे आहे ते स्वमनावरील विश्वास ! हो विश्वासच!!! कि मी या कोरोनावर विजय प्राप्त करू शकतो! मी लढू शकतो! मला माझ्या उर्वरित आयुष्यातील स्वप्न ( जे पहिले असेल ते) पूर्ण करण्यासाठी जगायचेच आहे ही अगाध इच्छा (will power)....! ती शाबूत ठेवणे गरजेचे आहे.आणि आज झालं एवढंच आहे की कुणाला कोरोना झाला रे झाला की बस...आजू बाजूचे, सखे सोयरे अक्षरशः किळस करू लागलेय त्या व्यक्तीची!! Hmmmm... काळजी घ्या! मास्क वापरा! सुरक्षित अंतर ठेवा! सॅनिटायझर वापरा! इथपर्यंत मानसिकता होणे नक्कीच चांगले!पण मग एकदम वाळीत टाकणार...त्या व्यक्तीला तुच्छ लेखणार...हे बरं नव्हे! शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा की जर तुमचा जन्म झालाय तर तुमचा मृत्यू देखील अटळ! मग का ?मी म्हणतो का?असं वागताय!! परिस्थिती समजून घ्या ! आपल्याला लढायचं आहे मारायचं किंवा मरायचं नाही कोरोनाने!!औषध नाही असे म्हणण्यापेक्षा मनाला सांगा कि हो मी लढू शकतो कोरोना सोबत! त्याला आपल्यावर स्वार होऊ द्यायचे नाही यासाठी नियम पाळणे हे आपले आद्य कर्तव्य! मात्र आपल्या आजूबाजूला कुणी कोरोनाबाधित झाले म्हणून त्याला तुच्छ लेखणे हे मात्र तुमच्या मनातील भीती म्हणणे वावगे ठरणार नाही! आज लाखो लोकांना कोरोना झाला अन त्यातील असंख्य लोक बरे देखील झाले !! जे जीवाशी गेले त्यांचे दुर्भाग्य म्हणा किंवा काही मनाने खचले म्हणा !! शेवटी सांगायचं एकच आहे की स्वतःवर विश्वास ठेवा! मनातील भीती काढा! अन जन्माला आल्यानंतर मला हे पूर्ण करायचेच आहे असे जे ही स्वप्न असेल ते समोर ठेवा! कि मी हे पूर्ण केल्याशिवाय मरणार नाहीच!!महाभारतात पितामह भीष्मांबद्दल सर्वांनीच ऐकलंय की त्यांना इच्छा मरण होते!!!! हो ना? अरे तुम्हाला देखील इच्छा मरणच आहे! फक्त त्याचा गाढ अर्थ समजून घ्या की मन थकत नाही किंवा जन्माला आल्यानंतर आपल्या मनाने जो चंग बांधलाय (ध्येय) ते पूर्ण केल्याशिवाय मला हा पृथ्वीतल सोडायचा नाही ही मनोकामना जर मनात असेल तर कोरोनाच काय? अगदी धावती गाडी जरी तुम्हाला धडकून गेली तरी तुम्ही मरू शकणार नाही हे लक्षात घ्या! वर्षापासून लिहू म्हणतोय पण कदाचित आज ती वेळ आली असावी म्हणून लिहितोय की घाबरू नका! काळजी घ्या! आजच नांदगाव तालुक्याला लाभलेले देवदूत अर्थात ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.रोहन बोरसे सरांकडे दाखल केलेले 80 वर्षाचे देवळ्या बाबा(रावसाहेब संपतराव देशमुख, हिसवळ बु ) यांना कोरोनावर विजय प्राप्त करून घरपोच सोडून आल्यानंतर हे लिहावं वाटतंय! देवळ्या बाबा म्हणजे 1962 ते 1964 दरम्यान सीमेवर लढलेले जवान... सीमेवर आपली सेवा बजावत असताना मेडिकल अनफिट झाल्याने घरी आले...तदनंतर मातीचे बंधारे, कालवे, तलाव यावर मुकादम म्हणून राहिले...शासकीय नर्सरी सांभाळल्या..होईल ते अन येईल ते काम करत बघता बघता हिसवळ गावात 8 मंदिरे उभारली अन माझी भेट झाली तेंव्हा एकच बोलले होते की भगवानराव आता फक्त मारुती मंदिर बांधले की मग निरोप घ्यायचा!!! बस तेच वाक्य (अंतिम ध्येय)...माझ्या पक्के मनात होते..कारण या कोरोनाने आता 22 मार्चला देवळ्या बाबाला ही हेरले!! पण देवळ्या बाबांचे ठाम ध्येय (मारुती मंदिर), सर्वांचे देवदूत डॉ. रोहन बोरसे यांची गेल्या 10 दिवसात देवळ्या बाबांवर केलेल्या उपचारांची निस्वार्थ सेवा अन मी काय? एकच पहाट असो वा मध्यरात्र देवळ्या बाबांना केवळ त्यांच्या अंतिम ध्येयाची (मारुती मंदिर) फोनवर आठवण करून देणे एवढंच! 10 दिवसात हजार फोन भगवंतराव मला घरी जायचंय! मी प्रत्येक कॉलला एकच उत्तर मारुती मंदिर बांधायचं ना! मग थांबा 2 दिवस अजून दवाखान्यात!! डॉ बोरसे सरांचे अखंड प्रयत्न..वेळोवेळी मी विचारल्यावर एकच सांगणार माऊली घाबरू नका बाबा बरे होत आहे...बाबांनी चांगली लढाई दिली आहे आणि ते जिंकणारच! बस हा समन्वय!!!! अन त्याची फलश्रुती की आज देवदूताने देवाचे मंदिर उभारण्याची अंतिम इच्छा बाळगणाऱ्या देवळ्या बाबांना अगदी ठणठणीत बरे केले!!!

का? …का?…का? लिहितोय मी हे सर्व? बरोबर ना? उत्तर एकच कि प्रत्येकजण या कोरोनासोबत लढू शकतो केवळ मनात ध्येय ठाम ठेवा जेही असेल ते(देवळ्या बाबाप्रमाणे)…सार्थ विश्वास ठेवा जे आपली सेवा करताय त्या देवदूत( जसे डॉ. रोहन बोरसे ) यांच्यावर…अन आपल्या उपचारादरम्यान येणाऱ्या फोनवर! की हो मला माझे ध्येय पूर्ण करायचे आहे! मला कोरोनासोबत लढायचे आहे!
असो फार लिहिले! कदाचित हा माझा फाजील आत्मविश्वास वाटेल! परंतु काय करणार? लिहिणे भाग होते ! तेंव्हा एकच सांगेल काळजी घ्या पण घाबरू नका अन स्वतःच्या मनाला पूर्णतः जागे ठेवा!की हो मला माझे ध्येय गाठायचेच आहे! मला चुकूनही कोरोना झाला तरी त्यावर विजय मिळवायचाच आहे!!!

( लेखक नांदगाव जि. नाशिक येथील दै. आवाज ह्या दैनिकाचे संपादक आहेत. )


Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!