निवडणुकांची रणधुमाळी – जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि मनपाच्या निवडणुका एप्रिल आणि मे महिन्यात ??

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३

राज्यातील २५ जिल्हा परिषदा, २८४ पंचायत समित्या आणि १४ मनपाच्या सार्वत्रिक निवडणुका एप्रिल अथवा मे महिन्यात होण्याचे संकेत मिळाले आहेत. राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुका घेण्याबाबत पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. राज्याचे निवडणूक आयुक्त यु. पी. एस. मदान यांनी निवडणुकीच्या पूर्वतयारीबाबत सर्वच राजकीय पक्षांशी बैठकीद्वारे संवाद साधला. एप्रिल, मे महिन्यात विविध टप्प्यांमध्ये निवडणुका होणार असल्याचे संकेत ह्या बैठकीमधून मिळाले आहेत. दरम्यान ओबीसींना आरक्षण देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून निर्णयाची सर्वानाच प्रतीक्षा आहे. निवडणुकांची रणधुमाळी सुरू होण्याची राजकीय कार्यकर्त्यांसह विविध पक्षांनाही उत्सुकता आहे.

राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुदती संपल्या आहेत तर ह्या महिन्यात काही संस्थांच्या मुदती संपत आहेत. मुदत संपण्याआधी निवडणुका होऊन सत्ता स्थापन व्हायला हवी होती. मात्र अनेकविध कारणांमुळे जिल्हा परिषद, पंचायत समित्या, मनपा निवडणुका आतापर्यंत रखडलेल्या आहेत. यासह ओबीसी आरक्षणाचे भिजत घोंगडे राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढवत आहे. ओबीसी आरक्षण नसेल तर निवडणुका नको असा निर्णय सर्वच राजकीय पक्षांन्नी घेऊन त्याला कायद्याचे कवच निर्माण करून घेतले आहे. परिणामी त्याशिवाय निवडणुका होणार नाहीत असे दिसून येते. आरक्षणाच्या बाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुद्धा सुरूच आहे. ह्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांशी निवडणुकांच्या पूर्वतयारीसंदर्भात चर्चा केली. यावेळी उमेदवार आणि मतदार यांना अधिकाधिक सुविधा ऑनलाईन देण्यासाठी आयोगाचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले. आगामी निवडणुकांत उमेदवारांना नामनिर्देशनपत्र भरण्यासाठी संकेतस्थळाद्वारे ऑनलाईन सुविधा दिली जाईल. ह्या बैठकीच्या अनुषंगाने राज्यातील २५ जिल्हा परिषदा, २८४ पंचायत समित्या आणि १४ मनपा निवडणुकीचा धुरळा एप्रिल आणि मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. विविध टप्प्यात निवडणुका घेण्यासाठी लवकरच ह्यावर निर्णय घेतला जाईल असे समजते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!