इगतपुरी तालुक्याचा कोहिनुर हिरा आदरणीय लोकनेते स्व. गोपाळराव तथा दादासाहेब गुळवे सामान्य शेतकरी कुटुंबातून तालुक्यालाच नाही तर राज्याला लाभले. बेलगांव कुऱ्हे सारख्या छोट्या खेड्यात जन्मलेले लोकनेते गोपाळराव गुळवे हेच ते तालुक्याचे अमोल रत्न. नासिक जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांमध्ये मैत्रीचे संबंध असणारा हा शेतकऱ्यांचा आणि सर्वसामान्य लोकांचे प्रतिनिधित्व करणारा लोकनेता. इगतपुरी तालुक्यासह जिल्ह्याला राजकारण आणि समाजकारण यांचा आदर्श त्यांनी दिलेला आहे. शेतकऱ्यांचा कळवळा असल्याने ग्रामीण राजकारणात विविध पदांना त्यांनी झळाळी आणली. बाहेरील तालुक्यातून निवडून येत जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवित असतांना मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषद अध्यक्षपद राज्यमंत्री दर्जाचे करणारा हा भुपुत्र अवघ्या राज्याला परिचित झाला. तालुक्यात गोंदे, वाडीवऱ्हे, इगतपुरी भागात कारखानदारांना कारखान्यांची उभारणी करायला त्यांनी भाग पाडले. स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगार निर्मिती करण्यासाठी ह्या भुपुत्राने कसलेली कंबर घराघरात चैतन्यदायी ठरली. सोसायट्या, सिंचन प्रकल्प , ग्रामीण कारागिरांना कर्जपुरवठा यासाठी त्यांनी क्षण क्षण व्यतीत केला. घोटी बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून दिली. जिल्हा बँकेसह सहकारी साखर कारखान्यांत महत्वपूर्ण पदे भूषवित त्यांनी शेतकरी हितासाठी जीव ओतून काम केले. तालुक्यात विविध गावांत त्यांनी शैक्षणिक पाया भक्कम होण्यासाठी शाळांचे उभारलेले काम एकमेवाद्वितीय ठरलेले दिसते. अडल्या नडलेल्या लोकांनी आपल्या अडचणी सोडवण्याचे हक्काचे व्यासपीठ म्हणून त्यांचेकडे सतत अपेक्षा केलेली आहे. तालुक्याचा विकाससूर्य असणारा हा भूपत्र रात्रंदिवस शेतकरी हितासाठीच झटला. तालुक्याचे आमदार, खासदार, गावांचे सरपंच, सभापती, नगराध्यक्ष कोण असावा याची दूरदृष्टी ठेवून मनात योजलेले कार्य सफलच करणारा हा भूपत्र काही वर्षांपूर्वी अपघाती स्वर्गवासी झाला. त्याने उभं केलेलं तालुक्यातील भूपुत्रांसाठी असलेलं सगळं कार्य सर्वांना प्रेरकबळ देणारे आणि कौतुकास्पद आहे. इगतपुरी तालुक्यासह नाशिक जिल्ह्याची प्रतिष्ठा, सार्वजनिक जीवनातील सचोटी, उच्चतम नैतिक भूमिका, साधेपणातून लोकक्रांती, स्पष्टपणातून लोकसेवा आदी विविध गुणांनी विभूषित असलेले स्वर्गीय लोकनेते गोपाळराव तथा दादासाहेब गुळवे..! सर्वोत्तमतेचा आदर्श असणाऱ्या वंदनीय दादांच्या सानिध्यात विविध प्रसंगी काही सोनेरी क्षण व्यतीत करता आले. यावेळी त्यांच्या मुखातील संकलित केलेले काही निवडक विचारकण त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आदरांजली म्हणून…!
■ शांतता आणि सुव्यवस्था असल्याशिवाय कोणतेही गाव अथवा कोणतीही लोकशाही टिकूच शकणार नाही. शांतता आणि सुव्यवस्था टिकली तरच लोकांचे प्रश्न सोडवता येतील.
■ सर्वोत्तम शिक्षण देणाऱ्या शिक्षणसंस्था इगतपुरी तालुक्यातील लोकांना पुढे नेऊन राष्ट्रनिर्माण करण्यास तत्पर राहतील. म्हणूनच महाराष्ट्र शिक्षण मंडळाने गोरगरिबांपर्यंत ज्ञानाची गंगा नेण्याचा संकल्प केला आहे. माझे ते स्वप्न आहे.
■ रस्त्यांचे बांधकाम हाती घेणे हा रोजगार निर्मितीचा एक प्रभावी मार्ग आहे. चांगल्या रस्त्यांमुळे सामान्य शेतकऱ्यांच्या शेतमालाला नवनवी विशाल बाजारपेठ, शेतमालाच्या उत्पादनाला चालना मिळते.
■ घराघरात निरामय आरोग्य नांदावे यासाठी आरोग्यसंस्था आहेत. बेलगाव कुऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करतांना जनतेचे उत्तरदायित्व पार पाडल्याचे समाधान मिळाले.
■ राजकारणापासून अलिप्त असणाऱ्या समाजातील निष्ठावान, प्रज्ञावान नागरिकांनी औदासिन्य झटकून टाकावे. यांच्यातील चांगल्या लोकांनी मोठ्या संख्येने निवडणुका लढविल्या पाहिजे.
■ कोणत्याही निवडणुकीत न चुकता आपल्या मतदानाचा अधिकार वापरायलाच हवा. ज्ञानसंपन्न, दूरदृष्टी असलेल्या चारित्र्यवान व्यक्तींचीच उमेदवार म्हणून निवड झाली पाहिजे.
■ सत्य समजावून घेण्याचे शहाणपण पुढाऱ्यांना प्राप्त झाले पाहिजे. आणि जे जे सत्य असेल ते ते लोकांपुढे मांडण्याची हिम्मत त्यांनी दाखवायला हवी.
■ अधिक आराम करण्यापेक्षा अधिक परिश्रम करण्याची वृत्ती अंगिकारावी. शासकीय कर्मचाऱ्यांनी कामाच्या वेळात चहा प्यायला जायची आणि गप्पा मारत बसण्याची सवय सोडून दिली पाहिजे.
■ इगतपुरी तालुक्यात पाटबंधारे आणि सिंचनाच्या योजनांवर आपण आपले प्रयत्न केंद्रित केले तर अन्नधान्याच्या उत्पादनात तालुक्याचा क्रमांक एक नक्की येईल.
■ लोकांनी कायदा पाळला पाहिजे हे तर महत्वाचे आहेच; परंतु त्यांनी सभ्यतेच्या उच्च निकषांचे पालन करणे त्याहूनही महत्वाचे आहे.