कामगार चळवळीचे जनक रावबहादूर नारायण मेघजी लोखंडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त

संकलन :- उत्तमबाबा गांगुर्डे, अध्यक्ष नाशिक जिल्हा सेवानिवृत्त सेवक असोसिएशन

महाराष्ट्राला सत्यशोधक विचारवर्तनाचा वारसा देणारे महात्मा जोतिराव फुले यांचे सहकारी रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे नाव आहे. भारतीय कामगार चळवळीचे जनक असे त्यांना सार्थपणे म्हटले जाते.

१८७० नंतरच्या कालखंडात मुंबईतील गिरणी उद्योगात होत असलेल्या भरभराटीने मँचेस्टरच्या गिरण्यांचे डोळे दीपले. मुंबईच्या गिरणी उद्योगाच्या स्पर्धेचा धोका त्यांना जाणवू लागला. त्यावर निर्बंध घालण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न सुरू केले. त्यातूनच मुंबईच्या गिरणी कामगारांसाठी फॅक्टरी अ‍ॅक्ट लागू करण्याची मागणी जोर धरू लागली. सरकारने मार्च १८७५ मध्ये एक कमिशन नेमले. त्यात अधिकांश गिरणीमालक किंवा संचालक होते. अन्य समाजघटकही कायद्याच्या फारसे बाजूने नव्हते. बऱ्याच चर्चा, मतमतांतरे आणि गदारोळानंतर अखेर नोव्हेंबर १८७९ मध्ये सरकारपुढे फॅक्टरी बिल मंजुरीसाठी आले. यातील मजुरांच्या कामाच्या तासांवर मर्यादा घालण्याच्या तरतुदीमुळे गिरण्या आणि मजूर अशा दोघांचेही नुकसान होईल, अशी हाकाटी मिल ओनर्स असोसिएशनने सुरू केली. मुंबईतल्या गिरणी उद्योगाला खीळ बसेल, असे त्यांचे म्हणणे होते. मंदी आहे, बेकारी आहे, कामगार प्रशिक्षित नाहीत. कामाचे तास कमी करू नयेत, असा युक्तिवाद होता. माध्यमांचीही मालकांना साथ होती. अपवाद होता तो बी. एम. मलबारी यांच्या इंडियन स्पेक्टेटर या आणि रास्त गोफ्तार या वर्तमानपत्रांचा. त्यांनी कामगारांच्या बाजूने युक्तिवाद केला. तशातच सत्यशोधक चळवळीचे नेते नारायण मेघाजी लोखंडे यांच्या कुशल संपादकत्त्वाखाली ९ मे १८८० पासून दीनबंधू हे पत्र निघू लागले. दीनबंधूने सुरुवातीपासूनच उपेक्षित वर्गाच्या, कष्टकऱ्यांच्या दुखण्यांना वाचा फोडली. लोखंडे यांनी स्वत: मांडवीच्या गिरणीत स्टोअर कीपर म्हणून काम केलेले होते. गिरणी कामगारांचे हाल त्यांनी पाहिले होते. दीनबंधूतील लेखनासोबतच त्यांनी गिरणी कामगारांना संघटित करण्यास सुरुवात केली. दरम्यान, १५ मार्च १८८१ रोजी गव्हर्नर जनरलच्या कायदे कौन्सिलने फॅक्टरी बिल मंजूर केले. तथापि मालकवर्गाच्या विरोधामुळे त्यातील तरतुदी सौम्य केल्या होत्या. लहान मुलांना कामावर घेण्याचे वय ७ वर्षे होते. त्यावर टीका करत लोखंडे यांनी ते किमान १६ वर्षे असावे, नोकरीमुळे शिक्षणास मुकावे लागणाऱ्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था सरकारने करावी, गिरणी कामगारांना मिळणारा तुटपुंजा पगार वाढवावा अशा मागण्या केल्या. नुसत्या मागण्या करून ते थांबले नाहीत. कामगारांना एकत्र करून १८८४ साली ‘बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन’ ही देशातील पहिली कामगार संघटना सुरू केली. याच साली कायद्यात सुधारणा करण्यासाठी कलेक्टर डब्ल्यू. बी. मूलक यांच्या अध्यक्षतेखाली एक फॅक्टरी कमिशन नेमले गेले.

आपल्या मागण्या मांडण्यासाठी २३ सप्टेंबर १८८४ रोजी सुपारीबाग, परळ येथे गिरणी कामगारांची पहिली ऐतिहासिक सभा झाली. सुमारे चार हजार कामगारांच्या एकजुटीचे दर्शन या सभेत घडले. याच सभेत लोखंडे यांनी कामगारांना साप्ताहिक सुटी दिली जावी, अशी मागणी केली. पगार नियमित त्या-त्या महिन्याला व दर महिन्याच्या १५ तारखेपर्यंत दिला जावा, कामावरून काढायचे असल्यास १५ दिवसांची नोटीस द्यावी, फॅaक्टरी कमिशनवर कामगार प्रतिनिधींची नेमणूक केली जावी या मागण्या मांडल्या. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या प्रतिष्ठित वर्तमानपत्रात या सभेचा वृत्तांत प्रसिद्ध झाला. पुन्हा २६ सप्टेंबर रोजी भायखळा येथे अशीच भव्य सभा झाली. ५ हजार ५०० कामगारांच्या सह्यांचे निवेदन कलेक्टरांना दिले गेले. आणि मग सुरू झाला आंदोलनांचा सिलसिला.

नोव्हेंबर १८८५मध्ये दोन गिरण्यांमधील कामगार पगारकपात आणि पगार देण्यास विलंब या मुद्द्यांवर संपावर गेले. १८८७ मध्ये कुर्ल्याच्या स्वदेशी मिलमध्ये संप झाला. साधी साप्ताहिक सुटी मान्य होईना. शिवाय रविवारी हिंदू लोकांस सुटी कशाला हवी, असे ब्रिटिश अधिकाऱ्यांसही वाटत होते. सणासुदीच्या सुट्ट्या पुरेशा आहेत, असा युक्तिवाद केला गेला. त्यावर गिरणी कामगार असणारे बहुसंख्य लोक हे खंडोबाचे भक्त असून रविवार हा खंडोबाचा वार असल्याने साप्ताहिक सुटी रविवारीच असावी, ही मागणी लोखंडे यांनी जोरदार रेटली. २४ एप्रिल, १८९० रोजी रेसकोर्सवर सुमारे १० हजार कामगारांची भव्य सभा झाली आणि जनमताचा हा वाढता रेटा पाहून अखेर १० जून, १८९० रोजी रविवारची साप्ताहिक सुटी मंजूर करण्याचा निर्णय मालकांना घ्यावा लागला. आज आपण सर्वचजण ज्या रविवारच्या सुटीची आतुरतेने वाट पाहतो त्यामागे सुमारे १३० वर्षांपूर्वी हजारो कामगारांनी केलेला संघर्ष आहे. अन्य मागण्यांबाबतही अनुकूल वातावरण तयार झाले.

लोखंडेंचे कर्तृत्व केवळ कामगार चळवळीपुरतेच मर्यादित नाही. ते सर्वार्थाने सत्यशोधक होते. हिंदी शेतकरी सभेचे ते सक्रीय कार्यकर्ते होते. लोकमान्य टिळक आणि समाजसुधारक आगरकर यांच्या डोंगरी तुरुंगातून झालेल्या सुटकेनंतर त्यांची वाजतगाजत मिरवणूक काढून त्यांना मानपत्र अर्पण करण्यात लोखंडे यांचा पुढाकार होता. त्यांनी ११ मे, १८८८ रोजी भायखळा येथे आयोजित केलेल्या सभेत जोतिराव फुले यांना महात्मा हे बिरूद मोठ्या अभिमानाने जाहीरपणे लावले गेले. ब्राह्मण विधवांच्या केशवपन विरोधात लोखंडे यांनी डोंगरी येथे २३ मार्च १८९० रोजी न्हावी समाजाची सभा बोलावली होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे १८९३ मध्ये झालेल्या हिंदू-मुसलमान दंगलीने व्यथित होऊन त्यांनी शांतता समित्या स्थापन करण्यात पुढाकार घेतला. सहाय्य निधी उभारला आणि १ ऑक्टोबर १८९३ रोजी राणीच्या बागेत एकोपा मेळावा आयोजित केला.

धर्म, जाती यावरून कष्टकऱ्यांमध्ये, समाजात फूट पडू नये, अशी त्यांची भूमिका होती. मराठा ऐक्येच्छु सभा, मराठा रुग्णालय यांचे ते संस्थापक होते. पंचदर्पण या पुस्तिकेचे लेखन, सत्यशोधक निबंधमाला अथवा हिंदू धर्माचे खरे ज्ञान या पुस्तिकांचे लेखन तसेच दीनबंधूतून समाजाभिमुख परंतु परखड लेखन त्यांनी सातत्याने केले. त्यांचे चौफेर काम आणि उदारमतवादी दृष्टिकोन यांनी प्रभावित होऊन ब्रिटिश सरकारने त्यांना ‘जस्टीस ऑफ पीस’ आणि ‘रावबहादूर’ या पदव्या दिल्या. पण त्यांची खरी पदवी सत्यशोधक हीच होती. या कर्तृत्ववान नेत्याचे निधन वयाच्या अवघ्या ४८ व्या वर्षी ९ फेब्रुवारी, १८९७ रोजी प्लेगमुळे ठाणे येथे झाले. त्यांच्या ह्या उत्तुंग कार्यास सलाम आणि त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन….!

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!