अपंगत्वावर मात करीत खडकाळ माळरानावावर फुलवली शेती : वाकी येथील दिव्यांग शेतकऱ्याने मिळवले भरघोस आर्थिक उत्पन्न

सुनील शिंदे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १

इगतपुरी तालुक्याची प्रचंड पावसाचा तालुका अशी ओळख आहे. सरासरी 3500 मिमी पाऊस पडणाऱ्या या तालुक्यात खडकाळ जमिनीचे प्रमाण जास्त असून धो धो पाऊस पडूनही पाणी वाहून जात असते. या पाण्याचा साठा करण्यासाठी शासनाने तालुक्यात अनेक धरणे तयार केली असल्याने धरणाचा तालुका अशी नवी ओळख इगतपुरीची झाली आहे. अशाच पंतप्रधान सिंचन योजनेतून वाकी खापरी नदीवर बांधण्यात आलेल्या वाकी खापरी धरणाच्या पाण्यामुळे धरणालगतची अनेक गावांचा पारंपरिक पिकांना तिलांजली देत नगदी पिके घेण्याकडे कल वाढला आहे. अशाच वाकी गावातील एका दिव्यांग तरुणाने आपल्या वडिलोपार्जित माळरान खडकाळ जमिनीला धरणाच्या पाण्याच्या भरवशावर सुपीक बनवले आहे. या जमिनीतून टोमॅटो, काकडी, कारले अशी नगदी पिके घेऊन आपले आर्थिक उत्पन्न वाढवले आहे.

वाकी येथील मोहनसिंग ( बाळू )परदेशी यांची घोटी वैतरणा रस्त्यावर साडेतीन एकर जमीन होती. पण ही जमीन उताराची आणि खडकाळ असल्याने पावसाच्या पाण्याच्या भरवशावर कोणतेच पीक घेता येत नव्हते. आणि घेतले तरी उत्पन्न मात्र मिळत नव्हते. अशातच पंतप्रधान सिंचन योजनेतून खापरी नदीवर वाकी खापरी धरणाचा प्रकल्प काही वर्षांपूर्वी पूर्ण झाला. अडीच टीएमसी क्षमता असलेल्या या धरणाच्या पाण्याचा वाकी जवळील कालव्यातुन विसर्ग चालू झाला. यामुळे परदेशी यांचे दिव्यांग चिरंजीव सपन परदेशी यांनी या माळरानाला सुपीक बनवून नगदी पिके घेऊन अधिकाधिक उत्पन्न घेण्याचा निश्चय केला. त्यांनी ही संकल्पना आपल्या वडिलांना सांगितली. घरच्यांनीही या संकल्पनेला संमती दिली. सपन यांनी एका बँकेचे अर्थसहाय्य घेत जेसीबी यंत्र आणि मजुरांच्या  सहाय्याने या माळरानावर पाण्याचा निचरा होणार नाही याची काळजी घेत बांध घालून शेती तयार केली. या माळरानावरील दगडे वेचून काढली. यामुळे कोणेकाळी फक्त गवताचे आणि बाभळीचे रान असलेल्या या जमिनीवर परदेशी यांनी टोमॅटो, काकडी, वांगी, सिमला मिरची आदी पिके घेऊन उत्पन्नात वाढ केली आहे. सपन परदेशी या दिव्यांग बांधवाने आपल्या अपंगत्वाचा बाऊ न करता अपंगत्वावर मात करीत मातीमोल माळरानाचे सोने केल्याने सपन परदेशी यांचे कौतुक होत आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!