पीडित आदिवासी कुटुंबांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी दिला शब्द
इगतपुरीनामा न्यूज, दि. २१
इगतपुरी तालुक्याच्या काळुस्ते भागात नरभक्षक होण्याच्या दिशेने बिबट्या वाटचाल करीत आहे. ह्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यात नुकतेच एक निष्पाप बालक ठार झाले. एक बालक जखमी असून यापूर्वी सुद्धा बऱ्याच व्यक्तींवर बिबट्याचा हल्ला झालेला आहे. वन खात्याच्या अकार्यक्षमतेमुळे जंगलतोड, अवैध भट्ट्या असल्यामुळे हिंस्त्र प्राणी मानवी वस्तीत येऊन दहशत करीत आहेत. हिंस्त्र बिबट्याचा वावर वाढल्याने काळुस्ते भागातील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वन खात्याने तातडीने सर्व व्यवस्थापन कौशल्य वापरून बिबट्याला तातडीने जेरबंद करावे अशी मागणी इगतपुरी पंचायत समितीचे उपसभापती विठ्ठल लंगडे यांनी इगतपुरीचे वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांच्याकडे केली आहे. काळुस्ते येथील दरेवाडी आणि फोडसेवाडी परिसरात गोरगरीब आदिवासी नागरिक बिबट्याच्या दहशतीखाली असून निष्पाप बालकांचा बळी गेला आहे. ह्या पार्श्वभूमीवर उपसभापती विठ्ठल लंगडे यांनी पीडित आदिवासी कुटुंबांची भेट घेऊन सांत्वन केले. नाशिकचे उपवनसंरक्षक यांची भेट घेऊन पीडित कुटुंबांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचा शब्द श्री. लंगडे यांनी पीडित कुटुंबाला दिला.
उपसभापती विठ्ठल लंगडे पुढे म्हणाले की, लोकांवर हल्ला करून नरभक्षक होत असलेल्या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची आवश्यकता आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने काळुस्ते भागात धुमाकूळ घातला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात १ बालकाचा मृत्यू तर १ बालक जखमी आहे. ह्या भागातील शेतकऱ्यांना शेतात जावे लागते, मात्र बिबट्याची दहशत असल्याने शेतकऱ्यांना शेतात जाता येत नाही. त्यामुळे त्यांचे नुकसान होत आहे. तसेच मानवी वस्तीत अनेकवेळा या बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे मानवी जीवास धोकादायक ठरलेल्या या बिबट्याचा वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 11 ( 1 ) ( क ) नुसार तातडीने बंदोबस्त करावा असे ते शेवटी म्हणाले. ह्या सांत्वन भेटीच्या वेळी इगतपुरी पंचायत समितीचे सभापती सोमनाथ जोशी, उपसभापती विठ्ठल लंगडे, काळुस्तेच्या सरपंच वनिता घारे, ग्रामपंचायत सदस्य अनिरुद्ध घारे हजर होते. वनविभागाने केलेल्या कार्यवाहीची माहिती घेऊन पदाधिकाऱ्यांनी यावेळी सूचना केल्या.