इगतपुरीनामा न्यूज, दि. १
भारतीय सैन्य दलात विविध संकटांना सामोरे जात देशाचे रक्षण करणारे जवान भारतमातेचे भूषण असतात. अशा सैनिकांचा गावकऱ्यांना अभिमान असतो. इगतपुरी तालुक्यातील साकुर येथील हवालदार शिवनाथ कौसाबाई रंगनाथ सहाणे भारतीय सैन्य दलातील पॅरा रेजिमेंट बटालियन मधुन १८ वर्षची प्रदीर्घ देशसेवा करून सेवानिवृत्त झाले. त्यांचा सन्मान करण्यासाठी गावकऱ्यांनी वाजत-गाजत मिरवणूक काढली. गावचे सुपुत्र देशाचे रक्षण करतात याचा अभिमान असल्याने त्यांचा आदर्श गावातील नव्या उमेदीच्या तरुण पिढीने घ्यावा या हेतूने निवृत्त सैनिकांची मिरवणूक काढून त्यांचा सन्मान करण्याचे साकुरचे सैनिक, माजी सैनिक संघटना इगतपुरी आदींसह ग्रामस्थांनी ठरवले होते. हवालदार शिवनाथ कौसाबाई रंगनाथ सहाणे यांचा माता-पिता व पत्नी यांच्यासमवेत थाटात मिरवणूक काढून सन्मान करण्यात आला.
वाजत-गाजत निवृत्त सैनिकांची मिरवणूक काढण्यासाठी आकर्षक सजावट करण्यात आली होती. गाडीवर ध्वज पताकाही लावण्यात आल्या. निवृत्त जवान गणवेशात गाडीत बसले. ग्रामस्थांचा उत्साह पाहून तेही भावुक झाले. “भारत माता की जय’ असा जयघोष करीत व वाद्यवृंदांच्या साथीने गावात मिरवणूक निघाली. छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात मिरवणूक पोचल्यानंतर देशभक्तीच्या वातावरणात महिलांनी या सैनिकाचे औक्षण केले. यावेळी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष यादव पटेकर, ज्येष्ठ मार्गदर्शक सुबेदार मनोहर भोसले, सुबेदार विलास संधान, हवालदार रवींद्र शार्दुल, हरीश चौबे, शिवसेना माजी तालुकाप्रमुख राजू नाठे उपस्थित होते. यावेळी गावासह तालुक्यातील सर्व आजी माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. पाहुण्यांच्या हस्ते जवानाचा पत्नीसह सन्मान झाला. सरपंच विनोद आवारी यांनी गावातील युवकांनी हा आदर्श समोर ठेवून देश रक्षणासाठी सैन्यात भरती होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सैनिक संघटना इगतपुरीचे कार्याध्यक्ष विजय कातोरे तर सामजिक कार्यकर्ते रामा उगले यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. हवालदार शिवनाथ कौसाबाई रंगनाथ सहाणे हे भारतीय सैन्य दलातील पॅरा रेजिमेंट ११६ बटालियन मध्ये १ फेब्रुवारी २००४ मध्ये रूजू झाले. यानंतर त्यांनी देवळाली, नवी दिल्ली, जम्मु काश्मीर, श्रीनगर येथे आपली सेवा दिली. १८ वर्षाच्या प्रदीर्घ काळात त्यांनी सैन्यदलातील अनेक कोर्स करून आपल्या कामात पारंगत झाले. पुर्ण सेवेत त्यांनी आग्रा येथे ३५ वेळा जंप करून सुखरूप निवृत्त झाले.