
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील टाकेद बुद्रुक येथील सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर शाळेच्या मुख्याध्यापकाने शिक्षकाच्या मदतीने अत्याचार केल्याची घटना सर्वांना मान खाली घालायला लावणारी आहे. यामुळे पवित्र नाते अविश्वासात बदलले गेले असून यामध्ये सहभाग असणाऱ्यांवर कठोरात कठोर कठोर कारवाई केली पाहिजे. संपूर्ण तालुक्यातील जनतेला आणि शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलींना सुरक्षितता दाखवणे गरजेचे आहे. या प्रकरणी अत्याचारात आणखी कोणी सहभागी असेल तर सर्वांची कसून चौकशी करून त्यांना अद्दल घडवावी. यापुढे अशा घटना होणार नाही यासाठी प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात. अन्यथा राज्यभर आंदोलने करण्याचा इशारा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवाध्यक्ष लकीभाऊ जाधव यांनी दिला आहे. ह्या घटनेच्या निषेधार्थ १४ फेब्रुवारीला इगतपुरी तहसीलदार कार्यालयावर मूक मोर्चा काढला जाणार आहे. संबंधित शाळा चालवणारी संस्था पीडित विद्यार्थिनीचा यापुढचा होणारा संपूर्ण शैक्षणिक खर्च करणार आहे. यासह तिला १५ लाख रुपयांची आर्थिक मदत देणार असल्याचे लकीभाऊ जाधव म्हणाले.
टाकेद बुद्रुक येथील अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचारांतर आज शाळेची संस्था, पालक व गावकऱ्यांची घोटी पोलिसांनी बैठक बोलावली होती. ह्या बैठकीत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवाध्यक्ष लकीभाऊ जाधव, सर्वपक्षीय पदाधिकारी, पालक आणि गावकऱ्यांनी संस्थाचालकांना धारेवर धरले. चार तास चाललेल्या गदारोळाच्या बैठकीत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गावकरी व पालक यांच्यासह महिलांनी घटना घडली त्या दिवशी बाकीचे शिक्षक गेले कुठे याबाबत जाब विचारला. संस्थाचालकांनी यावेळी तक्रार असलेल्या ६ शिक्षकांना निलंबित करणार असल्याची माहिती दिली. एवढी गंभीर आणि संवेदनशील घटना घडूनही कोणतेही आमदार, खासदार आणि जिल्हा तालुका स्तरावरील शिक्षण अधिकाऱ्यांनी भेट न दिल्याने परिसरात नाराजीचा सुर बैठकीत व्यक्त झाला. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद अन्यायाच्या विरोधात असून नराधम प्रवृत्तीला फासावर लटकवण्याची मागणी करीत असल्याचे लकीभाऊ जाधव म्हणाले. व्हिडीओ बातमी पहा https://youtu.be/CcynHV4aUd4?si=DSiFbMD6BgfyFdQo