इगतपुरीनामा न्यूज, दि. १४
इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक प्रबळ होत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रत्येक गावात आपली पकड मजबूत करण्यासाठी कंबर कसली आहे. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांची रणनीती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्याचे काम इगतपुरी तालुक्यात राष्ट्रवादीकडून सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील दिग्गज राजकीय पदाधिकाऱ्यांनी आज मुंबई येथे भरगच्च कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ, सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. ह्या सोहळ्यात गोंदे दुमालाचे माजी सरपंच गणपत जाधव, नांदगाव बुद्रुकचे सरपंच देवा मोरे, माजी सभापती राजाराम धोंगडे, ग्रामपंचायत सदस्य परशराम नाठे, कृष्णा सोनवणे, सोसायटी चेअरमन विजय बळवंत नाठे, विजय कचरू नाठे, माजी सरपंच रमेश जाधव, कारभारी नाठे, हिरामण नाठे, संतोष आहेर, शांताराम जाधव, संजय अमृता नाठे, नारायण धोंगडे, नामदेव नाठे आदींनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.
पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी राष्ट्रवादीचे नाशिक जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, माजी आमदार शिवराम झोले, इगतपुरी तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, घोटीचे जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव, जेष्ठ नेते रतन पाटील जाधव, विष्णू पाटील राव उपस्थित होते. दिग्गजांचा राष्ट्रवादी पक्षातील प्रवेश हा राष्ट्रवादीच्या नव्या रणनीतीचा एक भाग असल्याचे राजकीय जाणकार सांगतात. यानंतरही राष्ट्रवादीत इनकमींग सुरू राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे इगतपुरी तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे यांनी दिली. त्यामुळे ही आगामी निवडणुकांची तयारी असल्याचेही सांगितले जाते. ह्या प्रवेशाने वाडीवऱ्हे जिल्हा परिषद गटासह इगतपुरी तालुक्यात राष्ट्रवादीचा वरचष्मा वाढला आहे. नुकतेच गोंदे दुमाला ग्रामस्थांच्या बैठकीत गणपत जाधव यांना निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला होता. ह्या पार्श्वभूमीवर आजच्या पक्ष प्रवेशाला मोठे महत्व मानले जात आहे.
वाडीवऱ्हे जिल्हा परिषद गटात संपूर्ण ताकदीने पक्षाचा उमेदवार निवडून येण्यासाठी आम्ही नियोजन केले आहे. त्यानुसार प्रदेश, जिल्हा आणि तालुका पदाधिकारी सक्रीयतेने काम करणार आहेत असे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार म्हणाले. यावेळी उपस्थितांनी अनुमोदन देत टाळ्यांचा कडकडाट केला.