इगतपुरीनामा न्यूज, दि. १४
मानवी जीवनात उत्पन्नाचे अनेक स्रोत असून आपण कृषिप्रधान असल्याने सरासरी शेतीतून मिळणारे उत्पन्न जास्त असते. म्हणून उत्पन्नाचे महत्त्व, गरजा कृषी क्षेत्र व इतर मार्गातून मिळणाऱ्या उत्पन्नाची गुंतवणूक करताना बचत कशी करावी. माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात शेअर्स मार्केटचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. यातून मिळणारे फायदे तोटे पैशांची बचत, गुंतवणूक, शेअर्सची विक्री व खरेदी समजून घेतली पाहिजे. पैशाची गुंतवणूक करताना नामांकित कंपन्यांचे शेअर्स खरेदी व विक्री करावे. सरकारी योजना, म्युच्युअल फंड, शेअर्स मार्केटिंग ऑनलाईन बँकिंग व्यवहार यामध्ये फसवणूक होऊ नये म्हणून आर्थिक साक्षरता असणे गरजेचे आहे. त्यामुळे वेगवेगळ्या कंपन्यांकडून मिळणाऱ्या बोनसला बळी न पडता विद्यार्थ्यांनी त्यातील धोकेही लक्षात घेतले पाहिजे. चांगल्या लाभासाठी चांगल्या आर्थिक सल्लागाराला भेटून आर्थिक उद्दिष्टे निश्चित करून योग्य दिशेने गुंतवणुकीला सुरुवात करा असे प्रतिपादन प्रा. डॉ. स्मिता पाकधाने यांनी केले.
मविप्र समाजाचे, कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय त्र्यंबकेश्वर येथे वाणिज्य मंडळाच्या उदघाटनाप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून केएसकेडब्ल्यू सिडको महाविद्यालयाच्या वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. स्मिता पाकधाने उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. के. शिंदेयांनी सांगितले की, शेअर्स मार्केट म्हणजे काय ? त्याचे प्रकार, फायदे तोटे समजून घेणे आवश्यक आहे. यशस्वी गुंतवणूकदार त्यांच्या गुंतवणूक क्षमतेच्या बाबतीत स्वतःला ओळखून असतात. त्यांचे मूलभूत संशोधन करतात. कंपन्यांचे विश्लेषण, गुणवत्ता, उत्पादने व योजनामध्येच गुंतवणूक करतात. म्हणून गुंतवणुकीसाठी सखोल अभ्यासाचे ज्ञान असणे आवश्यक असल्याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी बारकाईने केला पाहिजे. कार्यक्रम प्रारंभ सरस्वती मातेच्या प्रतिमा पूजन, दीपप्रज्वलनाने झाला. मान्यवरांचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. के. शिंदे यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय वाणिज्य विभागप्रमुख प्रा. नीता पुणतांबेकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. शास्वती निरभवणे यांनी तर आभार डॉ. अशोक भवर यांनी मानले. कार्यक्रमाप्रसंगी सत्रप्रमुख प्रा. संदीप गोसावी, डॉ. संदीप निकम, प्रा. कोठावदे, सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.