पूर्वसूचना न देता शेतकऱ्यांच्या विजपंपांची वीज तोडली : संतप्त शेतकऱ्यांचा अधिकाऱ्यांना घेराव ; शेतकरी रास्ता रोको आंदोलनाच्या पावित्र्यात

इगतपुरीनामा न्यूज, दि. ६

वीज वितरण कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी पंधरा दिवसांपासुन पूर्वसूचना न देता शेतकऱ्यांची विज तोडली. यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. वीज वितरण अधिकारी शेतकऱ्यांची कुठलीच बाजू ऐकून घेत नसल्याने वीजबिल भरा तरच वीज पुरवठा सुरु करू असे सांगत आहेत. यामुळे आज दहा ते बारा गावातील संतप्त शेतकऱ्यांनी वाडीवऱ्हे वीज वितरण कार्यालयावर मोर्चा काढून अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

यावेळी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख राजेंद्र नाठे, शेकापचे संदीप पागेरे, वाडीवऱ्हेचे सरपंच रोहिदास कातोरे, कुऱ्हेगावचे सरपंच भाऊसाहेब धोंगड़े, मुरंबीचे सरपंच बापू मते, सांजेगावच्या सरपंच नीता गोवर्धने,भाजपचे दशरथ दिवटे यांच्याबरोबरच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते..यावेळी राजेंद्र नाठे यांनी तालुका वीज कार्यालयात जावून कार्यकारी अभियंता प्रजापती यांच्याशी चर्चा करून विजपुरवठा सुरु करावा अशी मागणी केली आहे. वाडीवऱ्हेच्या वीज वितरण कार्यालयाने परिसरातील वाडीवऱ्हे, मुरंबी, सांजेगाव, गडगडसांगवी, लहांगेवाडी, गोंदे दुमाला,पाडळी देशमुख, कुऱ्हेगाव, बेलगांव कुऱ्हे, अस्वली स्टेशन, नांदगांव बुद्रुक ह्या परिसरातील विज कनेक्शन तोडल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यांनी आज एकत्र येत अधिकाऱ्यांनी तत्काळ व8ज पुरवठा सुरळीत न केल्यास शेतकरी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करतील असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. त्याच प्रमाणे शेतकरी मराठवाडयाला जाणारे पाणी सोडल्यास तीव्र विरोध करतील असा इशाराही यावेळी देण्यात आला.

अवकाळी मुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झालेले आहे. यात शेतकऱ्यांच्या पावसाने भिजलेल्या भात पिकाला व्यापारी कवडी मोल किंमत देत आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहे. अशाही परिस्थितीत रब्बी साठी शेतकऱ्यांनी तयारी केली असतांना आता शासन व वीज वितरण कर्मचारी वारंवार पूर्वसुचना न देता शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडते आहे, शेतकऱ्यांना धमकावत आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. बिल भरु पण रितसर रीडिंग असलेले अचूक विजबिलाचे सहा महिन्यांचे टप्पे करून दिले तर ते सोयीस्कर असेल असा सुर शेतकरी व्यक्त करीत आहेत. मात्र अधिकारी कुठलेही अधिकृत मीटर रीडिंग न घेता सरासरी देयके देवून शेतकऱ्यांचे बिल भरमसाठ वाढवून त्यात पन्नास टक्के सूट असल्याचे भासवून बिलांची वसूली करीत आहेत. यामुळे आघाडी सरकारने यावर मार्ग काढावा. लोकप्रतिनिधींनी जनतेच्या या ज्वलंत प्रश्नावर आवाज उठवून जनतेला दिलासा द्यावा अशी अपेक्षा करीत आहेत, अन्यथा जोपर्यंत वीज सुरु केली ज़ात नाही तोपर्यंत नाशिक मुंबई महमार्गावर ठिय्या आंदोलन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!