भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ३०
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणांची संख्या वाढवण्याचा निर्णय नुकताच झाला. इगतपुरी तालुक्यात विद्यमान परिस्थितीत ५ जिल्हा परिषद गट आहेत. या निर्णयामुळे इगतपुरी तालुक्यात एका नवीन जिल्हा परिषद गटाची भर पडणार आहे. अर्थातच पंचायत समितीचे २ गण सुद्धा वाढणार आहेत. नवा जिल्हा परिषद गट निर्माण करतांना आपसूकच अन्य जिल्हा परिषद गटांतील काही गावे नव्या गटाला जोडली जातील. नव्या गटाची निर्मिती करतांना मुंढेगाव हा नवा गट अस्तित्वात येण्याची शक्यता वाढली आहे. मुंबई आग्रा महामार्गालगतच्या गावांचा समावेश आणि लगतच्या अन्य गावांचा समावेश करून मुंढेगाव हा नवा गट निर्माण होईल अशीच जास्तच शक्यता आहे.
शिरसाठे जिल्हा परिषद गटातील खंबाळे आणि माणिकखांब ही दोन गावे घोटी जिल्हा परिषद गटाच्या हद्दीतून जातात. वास्तविक ही दोन गावे घोटी गटात असणे आवश्यक होते. तरीही ह्या गावांचा समावेश शिरसाठे गटात असल्याने अनेकदा भौगोलिक अडचणींचा सामना राजकीय पक्ष आणि उमेदवारांना करावा लागायचा. आता नवा मुंढेगाव गट निर्माण करतांना प्राधान्याने खंबाळे, माणिकखांब ही जोडली जातील. यासह शेणवड, समनेरे आणि वाघेरे भागातील काही गावे, वाडीवऱ्हे गटातील पाडळी देशमुख, मुकणे, जानोरी अशी काही गावे त्यात असण्याची शक्यता आहे. यामुळे आडवण, बलायदुरी, पारदेवी ह्या परिसरातील शिरसाठे गटातील काही गावे घोटी गटात समाविष्ट होतील. घोटी गटाला लागुन असणाऱ्या नांदगाव सदो गटातील कांचनगाव परिसरातील काही गावे सुद्धा घोटी गटात घेतली जाईल असे वाटते आहे. यासह खेड जिल्हा परिषद गटातील पिंपळगाव मोर गावासह काही गावे घोटी गटात जाण्याची शक्यता आहे. निनावी, भरविर बुद्रुक ही अनुसूचित क्षेत्रात नसलेली खेड गटातील दोन्ही गावे वाडीवऱ्हे गटात टाकून संपूर्ण खेड गट १०० टक्के अनुसूचित क्षेत्रात टाकण्यासाठी हालचाली दिसून आल्या आहेत. नवा मुंढेगाव जिल्हा परिषद गट निर्माण होईल तेव्हा मुंढेगाव आणि पाडळी देशमुख हा स्वतंत्र गण अस्तित्वात आणला जाऊ शकतो.
नव्या १ गटाची भर पडून ६ गट इगतपुरी तालुक्यात होणार असल्याने राजकीय आरक्षण सुद्धा बदलू शकते. कारण प्रत्येक गटातील गावे अदलाबदल झाल्याने लोकसंख्या सुद्धा बदलून आरक्षणावर परिणाम होणार आहे. उद्यापासून राजकीय आरक्षण निघायला हवे होते. तथापि नव्या गटाची रचना आणि इतर गटांची पुनर्रचना होणार असल्याने आरक्षण प्रक्रिया सुद्धा काही काळ लांबेल असे वाटते. नव्या रचनेमुळे राजकीय पक्षाच्या इच्छुकांचे सुद्धा मनसुब्यांवर सुद्धा दूरगामी परिणाम होईल. यामुळे याचा काहींना फायदा तर काहींना चांगलाच तोटा होईल.
नवे गट निर्माण करण्याचा शासनाने घेतलेला निर्णय पाहता ह्याचा ५ गटांतील गावे कमीजास्त होण्याचा स्पष्ट अंदाज आहे ह्या अंदाजानुसार मुंढेगाव हा नवा जिल्हा परिषद गट होऊ शकतो असा आमचा अंदाज आहे. यानुसार काय काय घडेल याचा वाचकांना ढोबळ आणि अभ्यासपूर्ण अंदाज देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. निवडणूक यंत्रणा ह्याबाबत योग्य ते काम करणार असल्याने त्यामध्ये बदल होऊ शकतो ह्याची वाचकांनी नोंद घ्यावी अशी विनंती आहे.