इगतपुरीनामा न्यूज, दि. २९
एसएमआरके महिला महाविद्यालय, वाणिज्य विभागाच्या वतीने आजपासून ४ डिसेंबरपर्यंत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनार आणि कॉमर्स वीकचे आयोजन केले आहे. यू ट्यूबच्या माध्यमातून या ऑनलाईन उपक्रमाचे प्रसारण आज करण्यात आले. प्रारंभी वाणिज्य विभागाचे समन्वयक डॉ. एन. बी. सोनगिरकर यांनी महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाबाबत विविध उपक्रमांची माहिती दिली. प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे यांनी मान्यवरांचे स्वागत करतानाच महाविद्यालयाची उल्लेखनीय शैक्षणिक परंपरा सांगितली. नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण योग्य पद्धतीने अंमलात आणले गेले तर युवा वर्गाला विकासाच्या असंख्य संधी प्राप्त होतील. राष्ट्राच्या प्रगतीसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण हाच एकमेव पर्याय आहे असे त्या म्हणाल्या.
डॉ. एम. एस. गोसावी आपल्या बीजभाषणात म्हणाले की, “संशोधनात बहुविद्याशाखीय आणि आंतर विद्याशाखा दृष्टिकोन विकसित करणे, त्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे नव्या धोरणात अपेक्षित आहे. तंत्रज्ञानासह संशोधन, प्राध्यापकांचे उच्च दर्जाचे प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांचे क्षमता आधारित कौशल्य विकसन या धोरणाचे वैशिष्टय आहे. यामुळे विद्यार्थ्यांना एकाच वेळी नेतृत्व कौशल्य आणि उद्योजकता दोन्ही आत्मसात करता येतील.” यावेळी प्रमुख तज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रयोगशील शिक्षण तज्ज्ञ सचिन जोशी उपस्थित होते. त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. “आज न्यू नॉर्मल काळात शिक्षकांची पारंपरिक भूमिका बदलली आहे. केवळ माहिती देण्याचे मर्यादित काम शिक्षकाचे, प्राध्यापकांचे नाही तर विद्यार्थ्यांच्या अंगभूत कौशल्य विकासासाठी प्रयत्न होणे हे महत्वाचे काम आहे. कोरोना महामारीच्या आधीचे जग आणि नंतरचे जग अशी जगाच्या कालखंडाची विभागणी झाली आहे. या नव्या जगात टिकून राहायचे असेल तर तंत्रज्ञानाला दुसरा पर्याय नाही. आपण जर नवे तंत्रज्ञान आत्मसात केले नाही तर प्रगती अशक्य आहे.” असे ते म्हणाले. प्रा. गीतांजली गीते यांनी आभार प्रदर्शन केले. डॉ. आश्लेषा कुलकर्णी, प्रा. प्रणिता निकुंब, प्रा. मैथिली लाखे यांनी सूत्रसंचालन केले. वेबिनारच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्या डॉ. कविता पाटील, डॉ. निलम बोकील, डॉ. नितीन सोनगिरकर, प्रा. गीतांजली गिते, प्रा. यशवंत केळकर, प्रा. मनीषा जोशी यांनी प्रयत्न केले.