वाल्मीक गवांदे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २२
कंपनीचे साहित्य ठेवण्यासाठी भाडे तत्वावर शेतकऱ्याने दिलेल्या शेत जमिनीतुन सदर कंपनीने शेतकऱ्याची कुठलीही संमती न घेता शेताचे खोदकाम करून लाखों ब्रास माती, मुरुम काढुन थेट समृध्दीच्या रस्त्यासाठी वापरल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या कंपनी विरोधात माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. ह्या शेतकऱ्याला कंपनीने संपुर्ण नुकसान भरपाई न दिल्यास तीव्र आंदोलनासह आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, इगतपुरी तालुक्यात नागपुर मुंबई समृध्दी महामार्गाचे काम प्रगती पथावर आहे. देवळे शिवारातील कंपनीने जेसीबी, फोकलँड, ट्रक, मशिनरी आदी साहित्य ठेवण्यासाठी काही शेतकऱ्यांच्या जमिनी भाडे तत्वावर घेतलेल्या आहेत. यात देवळे येथे समृध्दीचे काम करणारी कंपनी जीव्हीपीआर कंपनीने उघडेवाडी येथील शेतकरी सुरेश शिवराम उघडे यांची सहा एकर जागा गट नंबर २३४ ही कंपनीचे साहित्य ठेवण्यासाठी भाडे तत्वावर घेतली होती. मात्र शेतकऱ्याला न विचारताच शेतामधुन दगड, माती, मुरूम, झाडे आदी परस्पर काढुन घेऊन थेट समृध्दी महामार्गाच्या रस्त्यासाठी वापरल्याने शेतकऱ्याच्या मिळकतीचे मोठे नुकसान झाले आहे. असा मनमानी कारभार करणाऱ्या जीव्हीपीआर कंपनी विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. याप्रसंगी माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, शहापुरचे पंचायत समिती सदस्य प्रकाश धर्मा वीर, सुरेश शिवराम उघडे, एकनाथ रामभाऊ भले आदी उपस्थित होते.