
जगाचा पोशिंदा कष्टकरी शेतकरी जगला पाहिजे. सर्व उद्योगाचा पाया फक्त शेतीच आहे. शेती, शेतकरी आणि देश ही त्रिसूत्री जगासाठी उपयुक्त आहे असा दृढ विश्वास सहप्रयोग सिद्ध करून हा सार्थ विश्वास अनेक शेतकऱ्यांत निर्माण करणारे स्व. कारभारी गिते देवाचीची देणगी होती. प्रत्येक ठिकाणी परमेश्वराला जाणे शक्य नसते. अशा ठिकाणी स्व. कारभारी गीते यांच्या रूपाने दैवी विचारांचे व्यक्ती जाऊन कार्य करतात. स्व. कारभारी गीते यांच्या जाण्याने दैवी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याची खंत वाटत आहे.
शेतीचे उत्पन, मुख्यतः उत्पादित होणाऱ्या मालाची संख्या, मालाचा दर्जा आणि बाजारभाव या तीन गोष्टीवर अवलंबून असते. उत्पन्न = उत्पादन गुणिले दर्जा गुणिले बाजारभाव हे ते साधं सूत्र. या पैकी बाजारभाव ही एक गोष्ट शेतकऱ्याच्या हातात नाही. पण इतर दोन गोष्टी संख्या आणि दर्जा ( Quality and Quantity) मात्र शेतकऱ्यांच्या हातात आहेत. त्यामुळे जर शेतीतून समृद्ध व्हायचे असेल तर शेतकऱ्यांनी संख्या आणि दर्जा वाढवला पाहिजे. सोनोशी गावचे स्व. कारभारी गिते ( दादा ) सप्रमाण सप्रयोग सिद्ध करून दाखवले. या सूत्राचा वापर टोमॅटो आणि कांदा या दोन्ही पिकातून कोटी भर रुपये मिळवणारे स्व. कारभारी गिते ( दादा ) महाराष्ट्र नव्हे तर देशातील एकमेव शेतकरी ठरले. एकदा नव्हे तर अनेक वेळा त्यांनी ही किमया साधली. ह्या प्रयोगातून चालती बोलती स्व. दादांची प्रयोगशाळा लोकांच्या कायम चिरस्मरणात राहील.
शेतीसाठी जोपर्यंत धाडसी निर्णय घेतले जाणार नाहीत तोपर्यंत शेती समृद्ध होणार नाही. मग तो बोअरवेल घेण्याचा असो, विहिरींची संख्या असो, टँकरने पाणी असो, पाईपलाईन असो, पिकांच्या नवीन जाती, वेगवेगळे बाजार या सारख्या अनेक गोष्टीसाठी स्व. कारभारी दादांनी शेती विषयक निर्णय घेताना त्यांनी खर्चाचा विचार कधी केला नाही. खर्चाचा हिशोब मांडत बसला तर पिकाचा दर्जा घसरतो अशी त्यांची धारणा होती.
तण शेतीची मुख्य समस्या असते. निंदणी अथवा फवारणी मुळे शेतातील तण कमी होते पण त्याचा नायनाट करायचा असेल तर तणांचा उगम असणारे बांध साफ केले पाहिजे हे दादांनी फार पूर्वीच जाणले होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या ४० एकरातील सर्व बांध अतिशय साफ ठेवले. किंबहुना मुख्य पिकात काही ठिकाणी तण दिसेल तर बांधावर नाही. अनेक वर्षांच्या प्रयत्नाने त्याची संपूर्ण शेती देखणी झाली. महाराष्ट्र भरातून शेतकरी ती पाहण्यास येऊ लागले. असे कृतिशील शेतीला धर्म आणि कर्म मानणारे स्व. कारभारी गिते ( दादा ) यांचे ७ नोव्हेंबरला दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने शेतीचे कृषी विद्यापीठ थांबले असे वाटते. त्यांचे कृषीचे विचार आणि आचार अंगीकारणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
शेती बरोबर शिक्षणाचे महत्व स्व. दादा यांनी ओळखले होते. अति दुर्गम भागातुन दादानी मुलांना चांगले शिक्षण व संस्कार दिले. दादाची ३ मुले मोठा मुलगा भाऊसाहेब दादाची शेती वारसा चालवत असुन प्रगतशिल शेतकरी आहे. तर दुसरा मुलगा लहानू भारत सरकारच्या संरक्षण खात्यात उच्च पदावर कार्यरत आहे. तिसरा मुलगा हरिभाऊ मृद व जलसंधारण विभागात कार्यकारी अभियंता म्हणुन कार्यरत आहे. स्नुषा जया पंचायत समितीच्या सेवेत तर तिसऱ्या पिढीतील नातू तुषार यशस्वी बांधकाम व्यावसायिक आहे. संस्कारक्षम पिढीचे निर्माण, शेतकरी व्रताचे निष्ठेने पालन, समाजाला अनुभवाच्या शिदोरीचे मुक्तहस्ते वाटप करणारे स्व. कारभारी गीते ( दादा ) आज आपल्यात नाहीत. मात्र त्यांचे विचार, मार्गदर्शन आणि शेतीतले नवनवे प्रयोग ते आपल्यातच असल्याची कायम प्रचिती देतील. स्व. दादांना भावपूर्ण श्रद्धांजली…!
इगतपुरीनामा परिवारातर्फे स्व. दादांना भावपूर्ण श्रद्धांजली
