इगतपुरीतील गिरणारे व गावठा “अवघड” क्षेत्रात अन रस्ते नसलेल्या अनेक वाड्या “सोप्या” क्षेत्रात ; नांदगाव सदोची १ शाळा अवघड आणि १ शाळा मात्र सोप्या क्षेत्रात : शिक्षण विभागाने लावलेल्या जावई शोधाचे तालुकाभरात हसे ; अजबगजब शोधामुळे ८५० शिक्षकांमध्ये संताप

इगतपुरीनामा न्यूज, दि.

सह्याद्रीच्या पायथ्याजवळ वसलेला आणि महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई ज्या तालुक्याच्या सीमेवर वसलेले आहे त्या डोंगराळ, दुर्गम, अतिदुर्गम आणि दर्‍याखोर्‍याच्या इगतपुरी तालुक्यातून सर्वच डोंगर गायब करण्यात आले आहेत. होय.. तुम्ही बरोबर वाचताय..! असा अचाट पराक्रम  केला आहे इगतपुरी शिक्षण विभागाने. प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करण्यासाठी ठरवण्यात आलेले निकष डावलून शिक्षण विभागाने स्वतःची अक्कल गहाण ठेवून कार्यालयातच बसून घेतलेल्या निर्णयांचा फटका तालुक्यातील ८५० शिक्षकांना बसणार आहे. इगतपुरी शहरातील गिरणारे, गावठा ह्या 2 शाळा अवघड क्षेत्रात दाखवताना कोणता निकष लावला ? शासनाच्या निकषानुसार दळणवळण अवघड क्षेत्रातील गावे, साधने नसलेले, मोबाईल नेटवर्क नसलेल्या व रस्ता नसलेले, जीव मुठीत घेऊन जीवन जगणारे खैरेवाडी, जुनवणेवाडी, आदुरपाडा, धामडकीवाडी आणि कथ्रुवंगण, पेहरेवाडी, चाफ्याचीवाडी, आडाचीवाडी, खडाडवाडी, सप्रेवाडी, नागोसली, पोकळेवाडी अनेक वाड्यांना अवघड क्षेत्रातून कसे व कोणाच्या सांगण्यावरून वगळले ? नांदगाव सदो ह्या एकाच गावात दोन जिल्हा परिषद शाळा असून त्यात एक शाळा अवघड क्षेत्रात आणि दुसरी शाळा सोप्या क्षेत्रात हे गौडबंगाल नेमके काय ? यांसह अनेक गावांमध्ये समितीने चांगलेच दिवे लावले आहेत. समितीच्या सदस्यांनी गावांची पाहणी करून योग्य तो निर्णय तातडीने घेणे आवश्यक आहे. यासह याची चौकशी होऊन संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

अधिक माहिती अशी की शासनाच्या शिक्षण विभागाने फेब्रुवारीमध्ये ठरवलेल्या शिक्षक बदली धोरणानुसार अवघड आणि सोप्या क्षेत्राची निश्चिती करुन शिक्षकांच्या बदल्यांचे धोरण ठरलेले आहे. त्यानुसार इगतपुरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील सोप्या आणि अवघड क्षेत्राची विभागणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तालुकास्तरीय समितीने केली. ह्या समितीत तालुक्याचे गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, बांधकाम विभागाचे उपअभियंता यांचा समावेश करण्यात आला होता. त्यानुसार अवघड क्षेत्र ठरवतांना मुख्यालयापासुनचे अंतर, डोंगराळ भाग, दळणवळणाच्या सुविधा, काम करण्यास प्रतिकुल बाबी विचारात घेवून क्षेत्र निश्चिती करणे अपेक्षित होते. तथापि इगतपुरी तालुक्यातील बहुतांश भाग हा डोंगराळ, दुर्गम, अतिदुर्गम, अति पर्जन्याचा आणि दाट धुक्याचा म्हणजेच काम करण्यास प्रतिकुल असा आहे. मात्र तालुका प्रशासनासह त्रिसदस्यीय समितीने या सर्व बाबी दुर्लक्षित करुन तालुक्यातील फक्त 31 शाळा अवघड क्षेत्रात दाखवल्या आहेत. अनुसूचित असणाऱ्या पेसा क्षेत्रातील चक्क १५९ शाळा क्षेत्रात डोंगराळ भाग असूनही डोंगरांळ भागाचा साधा उल्लेखही केलेला नाही. आश्चर्याची बाब म्हणजे ह्या सर्व शाळा सोप्या क्षेत्रात दाखवण्यात आल्या आहेत. यामुळे इगतपुरी तालुक्यातुन सर्वच डोंगराळ भाग गायब करण्यात आले असुन सर्वच डोंगर गेले कुठे असा गहन प्रश्न प्राथमिक शिक्षकांना पडला आहे.

प्रचंड पाऊस पडणारा, तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाळ्यात अनेक महिने सुर्यदर्शन न होणारा, दाट धुक्यामुळे अपघात घडणारा, डोंगराळ म्हणून सर्वात जास्त धरणे असलेला. हिल स्टेशन म्हणून सरकार दरबारी नोंद असलेला तालुका शिक्षण विभागाच्या धोरणांनुसार मात्र एकदम सपाट ठरवण्यात आला आहे. बदल्यांचे निकष ठरवतांना इगतपुरी तालुक्यात अवघड क्षेत्र निश्चित करतांना मुख्यालयापासुनच्या अंतराचा असणारा महत्वपूर्ण मुद्दा तर कुठेच विचारात घेतलेला नाही. नाशिक जिल्ह्यातच असणाऱ्या कळवण तालुक्यात अति पर्जन्याचा भाग अवघड क्षेत्रात समाविष्ट करण्यात आला आहे. इगतपुरीत कळवणपेक्षा अधिक पाऊस असतांनाही इगतपुरीवर मात्र यामुळे अन्याय झाला आहे. इगतपुरीतुन वेगळ्या झालेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील १२१ गावे अवघड क्षेत्रात समाविष्ट होतात. मात्र इगतपुरीत त्रिसदस्यीय समितीने कार्यालयात बसून कागदावर केलेले प्रताप जिल्हा परिषद शिक्षकांवर अन्याय करणारे ठरत आहेत. परिणामी इगतपुरी तालुक्यातील शिक्षक विरुद्ध प्रशासन असा संघर्ष निर्माण होणार आहे. सध्या शिक्षकांच्या बदल्यांच्या काळ असल्याने त्रिसदस्यीय समितीने ठरवलेल्या सोप्या आणि अवघड क्षेत्राच्या निश्चितीवरून इगतपुरीच्या शिक्षण विभागाचे तालुका आणि जिल्हाभरात हसे झाले आहे.

ही गावे आहेत अवघड यादीतील गावे
आहुर्ली, नांदडगाव, म्हसुर्ली, काननवाडी आंबेवाडी, गिरणारे, इगतपुरी गावठा, चिंचलेखैरे, भरवज, दरेवाडी, निरपण, कुरुंगवाडी, पिंपळगाव भटाटा, शिंदेवाडी, मांजरगाव, त्रिंगलवाडी, पत्र्याचीवाडी, शिरेवाडी, सोनोशी, भावली खुर्द, जामुंडे, कामडवाडी, नांदगावसदो, गव्हांडे, कुशेगाव, राजवाडा, धारगाव, पायरवाडी, मारुतीवाडी, वाळविहीर, भैरोबाचीवाडी

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!