यंदा तरी शेतकऱ्यांना पीकविमा मिळणार का ? : बेमोसमी पावसाने शेतकरी उध्वस्त

निलेश काळे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १०

गेल्या दोन वर्षांपासुन सर्वजण कोरोना महामारीने त्रासलेले आहेत. त्यातच गेल्या तीन वर्षांपासून खरीप हंगामाच्या अखेरीस बेमोसमी पाऊसाने थैमान घालत आहे. त्यामुळे शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आहे. गेल्या आठवड्यात ऐन दिवाळीत भात कापणी जोरावर असतांना अवकाळी बेमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची पुरती धावपळ झाली. शेतातील-खळ्यावरील धान सुरक्षित ठिकाणी साठवतांना शेतकऱ्यांचे नाकी-नऊ आले.

गत दोन वर्षांत अवकाळी पावसामुळे भाताच्या धानाला शेतातच मोड आले होते. शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचा धानाचा पीक विमा काढला होता. शेतकऱ्यांनी पंचनामे, लोकप्रतिनिधींनी सरसकट नुकसानभरपाई देण्यासाठी शासन दरबारी विनवणी केली होती. सुज्ञ व शिक्षित शेतकऱ्यांनी पीकविम्याचा अँपवर स्वतः पंचनामा केला होता. कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक आदींनी देखील पंचनामे करून शासनाकडे पूर्तता करून सोपवले. काही अंशी शेतकरी सोडले तर अन्य कोणत्याही शेतकऱ्यांना कोणतीही नुकसानभरपाई अथवा पीकविम्याची दमडीही मिळाली नाही.

मागील हंगामात नुकसान होऊनही भरपाई न मिळाल्याने चालू खरीप हंगामातील पीकांचा विमा काढण्यास अनेक शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा बऱ्याच शेतकऱ्यांनी पीकविम्या काढला नाही. आधीचाच विमा मिळाला नाही तर यंदा तरी मिळणार का…? गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने अनेक शेतकरी व राजकीय प्रतिनिधी पंचनामे करण्याची मागणी करत आहे. पंचनामे करूनही भरपाई अथवा विमा परतावा मिळत नसेल तर कागदी घोडे नाचवून फायदा तरी काय…? असा प्रश्न सामान्य शेतकऱ्यांना पडला आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!