निलेश काळे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ९
आदिवासी संस्कृतीचे जतन होण्यासाठी आद्यक्रांतिकारकांनी केलेल्या कार्याला उजाळा देणं काळाची गरज आहे. त्यातून जनजागृती होऊन समाजात प्रबोधन होण्यास मदत होईल असे प्रतिपादन व्याख्याते मोहन उंडे यांनी केले. आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे व बिरसा मुंडांच्या संयुक्त जयंतीचे आयोजन पिंपळगाव मोर येथे केले होते. यावेळी श्री. उंडे बोलत होते.
आद्यक्रांतिकारकांच्या इतिहासाची पाने उलगडण्याची गरज ही काळाची गरज असून त्यातूनच समाज जागृती होईल. आदिवासी संस्कृती प्राचीन संस्कृती असून हडप्पा आदी संस्कृती काळापासून आदिवासी संस्कृती अस्तित्वात असल्याचे श्री. उंडे यांनी सांगितले. क्रांतिकारक राघोजी भांगरे व बिरसा मुंडा यांनी ब्रिटिशांविरोधी उठवलेला लढा यावेळी सांगितला. आदिवासी समाजासाठी असलेले कायदे व हक्क आदींचे सविस्तर विश्लेषण उंडेनी यावेळी केले.
या कार्यक्रमात रानकवींनी कवितांना उजाळा दिला. सह्याद्रीच्या कुशीतून निघालेल्या ज्यांच्या कविता शालेय अभ्यासक्रमात छापल्या गेल्या असे रानकवी तुकाराम धांडे यांच्या कवितांनी टाळ्यांचा कडकडाट झाला. पाठयपुस्तकाततील कवितांसोबतच प्रबोधन व जनजागृतीपर कविता त्यांनी सादर केल्या. यावेळी आदिवासी नेते व बिरसा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची भाषणे झाली, कार्यक्रमाचे अध्यक्षपद ग्रामपंचायतीच्या सरपंच यांनी भूषवले.