वटकपाडा गावातील “ती” शाळा आणि भरतीची जाहिरात फसवी : आदिवासी विकास विभाग करणार चौकशी

गोरख बोडके, विनायक माळेकर यांच्या सतर्कतेने बेरोजगारांची टळली फसवणूक

इगतपुरीनामा न्यूज, दि. २१

कुठं शाळा आहे ह्याचा कुठलाच तपास नाही, इमारत आणि कार्यालय सुद्धा नाही, गावकऱ्यांना सुद्धा आपल्या गावात अशी शाळा आहे हे माहीत नाही अन आदिवासी विकास विभागाची कोणतीही परवानगी नसलेल्या एका तथाकथित संस्थेने शाळेसाठी पदांच्या भरतीची जाहिरात वृत्तपत्रात दिली.  या प्रकरणी बेरोजगार पात्र युवक युवतींची नोकरीच्या आमिषातून फसवणूक होण्याची शक्यता असल्याने इगतपुरीचे माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, हरसूल जिल्हा परिषद गटाचे लोकनेते इंजि. विनायक माळेकर यांनी सखोल चौकशी केली. ह्यामध्ये अशी संस्था आणि शाळा अस्तित्वात नसल्याचे आढळून आले. फसवणुकीच्या इराद्याने भरतीची जाहिरात दिल्याचे स्पष्ट झाले. यासह आदिवासी विकास विभागाकडून संबंधित शाळेला कोणतीही परवानगी दिली गेलेली नाही. संबंधित शाळा आणि संबंधित संस्थाचालकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त संदीप गोलाईत यांच्याकडे करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी इगतपुरीचे माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, हरसूल जिल्हा परिषद गटाचे लोकनेते इंजि. विनायक माळेकर  यांनी अपर आयुक्तांशी चर्चा केली. आदिवासी विकास विभागाकडून याप्रकरणी कारवाई करण्यात येणार आहे. कोणीही फसव्या जाहिरातींना भुलून बळी पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वटकपाडा येथे प्राथमिक व माध्यमिक  महाविद्यालय आश्रमशाळेत विविध पदांची भरती असल्याबाबत वृत्तपत्रात जाहिरात देण्यात आली. मात्र संबंधित वटकपाडा, हरसूल, मुरंबी, शिरसगाव ह्या भागात अशी कोणतीही संस्था आणि शाळा अस्तित्वात नसल्याचे त्या भागातील सुजाण नागरिकांनी इगतपुरीचे माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, हरसूल जिल्हा परिषद गटाचे लोकनेते इंजि. विनायक माळेकर यांच्याकडे सांगितले. त्यानुसार सर्वांनी आदिवासी विकास विभागाकडे चौकशी केल्यानंतर संबंधित संस्था बेकायदेशीर आणि मान्यता न दिलेली असल्याचे समजले. बेरोजगार व्यक्तींची फसवणूक करण्याचा उद्धेश स्पष्ट होत असल्याने आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त संदीप गोलाईत यांच्याकडे तक्रार करण्यात आली. त्यांनी सांगितले की, आमच्या विभागाकडून वटकपाडा येथील कोणत्याही शाळेला अथवा भरतीला परवानगी देण्यात आलेली नाही. आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करून कारवाई करण्यात येईल.

गेल्या महिन्यात इगतपुरी येथील आवळखेडच्या नावाखाली अशीच एक संशयास्पद संस्था बेरोजगारांना चुना लावणार असल्याने त्यांचा पर्दाफाश गोरख बोडके यांनी केला होता. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील फसवणूक करण्याच्या इराद्याने भरती काढणाऱ्या संस्थेचाही पर्दाफाश गोरख बोडके, विनायक माळेकर यांनी केला आहे. कोणीही अशा तथाकथित फसव्या संस्थेच्या जाहिरातींना फसू नये. कोणाची फसवणूक झाली असल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!