इगतपुरीनामा न्यूज, दि. २१
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या शहरी भागासह ग्रामीण भागातही ऑनलाईन खरेदीसाठी सर्वसामान्यांचा कल दिसत आहे. भारतात फ्लिपकार्ट तसेच अमेझॉन या अग्रगण्य कंपन्या लोकांना सेवा देत आहेत. मात्र मुंबईहून नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, औरंगाबाद या ठिकाणी व्यवस्थितपणे व जलद सेवा मिळावी ही सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. म्हणूनच अमेझॉन कंपनीची ठाणे येथे शाखा असून अशीच एक शाखा इगतपुरी तालुक्यात झाल्यास तालुक्यातील रोजगाराचा प्रश्न सुटण्यास काही अंशी मदत होईल. यासाठी इगतपुरी येथे एक शाखा आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे प्रदेश सचिव भास्कर गुंजाळ यांनी मुंबईत केली आहे.
यावर संबंधित कंपनीच्या प्रशासनाशी बोलणी करून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन नाना पटोले यांच्याकडून मिळाल्याचे गुंजाळ यांनी सांगितले. यामुळे इगतपुरी तालुक्यातील बेरोजगारीची मोठी समस्या, सातत्याने वाढ होत असलेली गुन्हेगारी यावर नक्कीच तोडगा निघेल असा विश्वास व्यक्त होत आहे. इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी विविध प्रकल्पांना जमीन देऊन त्याग केला आहे. मात्र औद्योगिक वसाहतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य दिले जात नाही. मात्र अमेझॉन या कंपनीची शाखा इगतपुरी येथे झाल्यास त्यांना ह्या भागातील माहितीसाठी कर्मचारी वर्ग हा स्थानिक घेतल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आपसूकच पाच सहा हजार बेरोजगार युवकांना फायदा होईल असा विश्वास प्रदेश काँग्रेस सचिव भास्कर गुंजाळ यांनी व्यक्त केला.