
इगतपुरीनामा न्यूज, दि. २१
मुरगूड येथे झालेल्या आंदोलनादरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप अभियंता व शाखा अभियंता यांना मारहाण केलेल्या आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सरळसेवा प्रविष्ट वर्ग-2 अभियांत्रिकी अधिकारी संघटना प्रदेशाध्यक्ष इंजि. हरीभाऊ कारभारी गीते, सरचिटणीस इंजि. यशवंत गोरक्ष पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांकडे केली आहे.
संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देवगड निपाणी या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम मंडळ, कोल्हापूर अंतर्गत कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभाग, यांचे अंतर्गत Hybrid Annuity तत्वावर सुरू आहे. ह्या कामाचे कार्यारंभ आदेश जितेंद्र सिंग कलादगी या कंपनीला 2019 मध्ये देण्यात आले आहेत. हे काम तातडीने पूर्ण करावे व रस्त्याचे खड्डे भरून रस्ता वाहतूक सुरळीत ठेवावा या मागणीसाठी मुरगुड पंचक्रोशीतील लोकांनी 20 ऑक्टोबरला मुरगूड येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिले होते.
त्या निवेदनाचे अनुषंगाने प्रकल्पाची सद्यस्थिती व माहिती देणेसाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग, राधानगरीचे सहायक अभियंता श्रेणी-1 इंजि. अमित पाटील व शाखा अभियंता इंजि. सतीश किल्लेदार हे आंदोलनस्थळी पोहोचले. आंदोलनकर्त्याशी चर्चा करत असताना जमावातील प्रथम खबरी अहवालात नमूद केलेल्या लोकांनी सहायक अभियंता श्रेणी-1 इंजि. अमित पाटील व शाखा अभियंता इंजि. सतीश किल्लेदार यांना धक्काबुक्की करून मारहाण केली. शासकीय अधिकारी व कर्मचारी हे शासनाच्या योजनांची अंमलबजावणी करून त्याची माहिती नागरिकांना देत असतात. या कर्तव्य भावनेतून आंदोलन स्थळी नागरिकांना प्रकल्पाची माहिती देत असताना धक्काबुक्की व मारहाण करणे ही बाब निंदणीय व निषेधार्थ आहे. अशा घटनांमुळे अभियंत्यांचे मनोधैर्य खच्चीकरण होत आहे. क्षेत्रीय स्तरावर काम करताना त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी शासनाच्या संबंधित यंत्रणांना अशा समाजकंटकांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश शासन स्तरावरून देण्यात यावे अशी मागणी सरळसेवा प्रविष्ट वर्ग-2 अभियांत्रिकी अधिकारी संघटना प्रदेशाध्यक्ष इंजि. हरीभाऊ कारभारी गीते, सरचिटणीस इंजि. यशवंत गोरक्ष पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांकडे केली आहे.