लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील कुऱ्हेगाव येथील शेतकऱ्यांना पूर्व कल्पना न देताच मुकणे धरणाचे आवर्तन सोडले. यामुळे शेतकऱ्यांनी शेतात कापणी करून ठेवलेल्या भाताची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याने शेतकरी संकटात आले आहेत. मुकणे धरणाचे शाखाधिकारी विजय ठाकूर यांच्यासह सहकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. मात्र शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन बोळवण केल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांविषयी तीव्र संताप व्यक्त केला. मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अन्यथा आर्थिक संकटात असणाऱ्या शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास मुकणे धरणावर झोपा काढो आंदोलन करण्यात येईल असा इशारा छावा क्रांतिवीर सेनेचे तालुकाध्यक्ष गोकुळ धोंगडे यांनी दिला आहे.
रविवारी २६ तारखेला अवकाळी पाऊस व मुकणे धरणाच्या आवर्तनाचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्याना बसल्याने ते हवालदिल झाले आहेत. काल सकाळपासून मुकणे धरणाचे आवर्तन सोडले होते. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास जलद गतीने आवर्तन असल्याने नदी काठावरील लगतच्या शेतकऱ्यांचे कापणी करून ठेवलेले भात, बागाईत पिकाचे नुकसान झाले. बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी विष्णू धोंगडे, मधुकर धोंगडे, शिवाजी धोंगडे, रोहिदास धोंगडे, आप्पा धोंगडे आदींनी केली आहे. शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यानंतर पीकविमा कंपनीचा टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला मात्र त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने शेतकऱ्यानी नाराजी व्यक्त केली. मुकणे धरणाच्या आवर्तनाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अधिकाऱ्यांनी कागदी घोडे न नाचवता नुकसान भरपाई द्यावी अशी अपेक्षा आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास मुकणे धरणावर झोपा काढो आंदोलन केले जाईल असा इशारा छावा क्रांतिवीर सेना तालुकाध्यक्ष गोकुळ धोंगडे यांनी दिला आहे.