रविवार विशेष : दुसर्‍यांच्या यशोगाथांची पारायणे नका करू!

पुरुषोत्तम आवारे पाटील

परवा एक तरुण आला. आजवर म्हणे पन्नास लोकांच्या यशोगाथा वाचून झाल्या. अजूनही खूप वाचायच्या आहेत. गेल्या दीड वर्षापासून वाचतोय. प्रत्येकाच्या जीवनातून, त्याच्या संघर्षातून काहीतरी नवे शिकायला मिळत आहे. या दीड वर्षात स्वतःचा काहीतरी नवा धंदा सुरू करावा हे मात्र जमले नाही. या कोरोनाच्या काळात तर सगळे ठप्प झालेय. उत्पन्नाचा स्त्रोतच थांबलाय, काय करावे काहीच कळत नाही असे तो म्हणाला.कमी-अधिक प्रमाणात सर्व तरुणांची ही अवस्था आहे. कोरोना काळात नोकर कपातीचा वरवंटा सगळ्यांवरून फिरवला जातोय. ज्यांच्या घरात कोणी एखादाच कमावता असेल अशांवर मोठा ताण पडला आहे. या ताणाचा परिणाम लोकांच्या मानसिकतेवर होत आहे.

दिवसभर एकमेकांच्या तोंडावर तोंडे पडत असताना चिडचिड फोन रूम हो चिडचिड होऊन शब्दाने शब्द वाढत आहेत. कुटुंबातली शांतता झपाट्याने हरवत चालली आहे. अशा काळात बेरोजगारांनी कुणाच्या यशोगाथांचे पारायण करण्यात वेळ न घालवता प्रत्यक्ष सुरुवात कशी करता येईल याचा प्रयत्न करायला हवा.
गांधीजी नेहमी म्हणायचे ‘कर के देखो’ एखाद्या विषयावर खूप दिवस केवळ चर्चा करून भागणार नाही तर प्रत्यक्ष कृती करावी लागेल हा गांधींच्या ‘करके देखो’चा अर्थ होता. कोरोना काळात अनेकांच्या नोकर्‍या गेल्या, रोजगार हिरावले गेले. हे जरी सत्य असले तरी त्याचा बाऊ करून किती दिवस आपण रडत बसणार आहोत. रस्त्यावर हातगाड्या लावून लहान-मोठे व्यवसाय ज्यांनी सुरू करून बेरोजगारीवर मात केली अशा लोकांनी संकटाचे कारण धरून रडण्यात पुरुषार्थ मानला नाही. संकटाचे संधीत रूपांतर करताना सरदारांच्या वस्तीतही सलून चालून दाखवणारा घटकच मोठा समजला जात असेल तर आपण त्याच्या मार्गाने जाण्याचा विचार करायला हवा.
उन्हाळ्यात घराबाहेर रसवंती लावायची असेल तर त्याचे कागदावर आकडे मोड किती दिवस करावी याला काही मर्यादा असल्या पाहिजेत. उन्हाळ्याचा मोसम संपल्यावर रसवंती लावण्याची प्रेरणा मिळत असेल तर ती आपल्या काही कामाची नाही. यासाठी प्रत्यक्ष सुरुवात करावी लागेल. लोक काय म्हणतील? कामातला कमीपणा किंवा करावी लागणारी अंगमेहनत याचा विचार करून आपली पावले मागे घेतली जात असतील तर लक्षात घ्या आगामी काळात तुम्ही कोणताही व्यवसाय करायला तयार होणार नाही.
ज्याला अगदी छोटा व्यवसाय सुरू करायचा असेल त्याने एक हजार रुपये भांडवल यापासून तो सुरू करावा. त्यासाठी मिळेल त्या साधनांचा उपयोग करायला हवा. 50 हजार रुपये भांडवल उभे करायला एखाद्या सीझन खर्च फरक पडणार असेल तर पहाटे भाजी बाजारात जाऊन एक हजार रुपयात ठोक भावात मिळेल तेवढा भाजीपाला घेऊन हजाराचे पंधराशे करण्यावर भर देणारा नेहमी आपल्या व्यवसायाला पुढे घेऊन जाण्यावर विचार करीत असतो हे कायम लक्षात घ्या. स्वतःची आर्थिक पत निर्माण झाल्याशिवाय बँक, बाजार, पतसंस्था, मित्र, नातेवाईक कोणीही तुम्हाला उभे करणार नाही. त्यासाठी लहानसहान बचतीमधून विकण्याच्या कलेतून पैसा गोळा करून स्वतःची आर्थिक कुवत निर्माण करावी लागत असते. तुम्ही ज्याचे शिक्षण घेतले तो व्यवसाय करू शकला तर उत्तम नाही तर तोच केला पाहिजे याची गरज नसते. आजच्या काळात टोलेजंग हॉस्पिटल्स उभी करणारी डॉक्टर मंडळी प्रत्यक्षात शेती आणि प्लॉटच्या व्यवसायात पडली आहेत. एखाद्या वकिलाने छानसे हॉटेल सुरू केलेले असते तर कुण्या नोकरदाराने आइस्क्रीमचे पार्लर टाकलेले दिसते. त्यामुळे उद्योजकांच्या यशोगाथामध्ये अडकून पडू नका. एक-दोन वेळा त्या वाचून त्याने नेमके काय केले ते समजून अशी पुस्तके बाजूला ठेवायला शिका. उमेदीच्या काळात इतरांच्या यशोगाथाच वाचत बसला तर स्वतःची यशोगाथा कधी तयार करणार याचा विचार करून तत्काळ कामाला लागायला हवे. अत्यंत सकारात्मक विचार करून प्रसन्न चेहर्‍याने लोकांना भेटायला सुरुवात करा. लक्षात घ्या तुमचे रडगाणे ऐकून घेण्यात कोणालाच रस नसतो. उत्साह, ऊर्जा निर्माण करणार्‍या भन्नाट कल्पना सांगा, शेअर करा, मदतही मागा. लोक तुमच्या सोबत येऊ शकले नाहीत तर तुमच्या पाठीमागे तरी उभे राहतील. मग जिद्दीने जे तत्काळ करता येईल त्याचा फारसा विचार न करता सुरू करा, बघा यश तुमचेच आहे.

पुरुषोत्तम आवारे पाटील
संपादक दै. अजिंक्य भारत, अकोला
संवाद -9892162248

पुरुषोत्तम आवारे पाटील
संपादक दै. अजिंक्य भारत, अकोला

Similar Posts

2 Comments

  1. avatar
    शाहीर उत्तम रामचंद्र गायकर says:

    पुरुषोत्तम आवारे पाटलांचा लेख अप्रतिम, दिशादर्शक आहे. बेगडी अवसानात न गुंतता कर्तव्य व कार्यतत्पर होऊन कामास सुरुवात केली पाहिजे हा संदेश मिळतो !💐💐💐👌👍

  2. avatar
    श्री गोविंद संतोष लायरे says:

    खूप सुंदर लेख आहे. खरंच प्रत्येक तरुण, तरुणींनी छोटे मोठे व्यवसाय सुरू करणे आज काळाची आणि कुटुंबाची गरज आहे. आजकाल नोकरी हा विषय संपुष्टात येत असल्याने पर्यायी उत्पनाचे साधन असायला हवे.

Leave a Reply

error: Content is protected !!