इगतपुरीनामा न्यूज दि. ५ : कोविडमुळे बंद असलेल्या शाळांमध्ये काल तब्बल दीड वर्षानंतर शाळेची घंटा वाजली आणि विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शाळा गजबजून गेल्याचे चित्र काल पाहायला मिळाले.
राज्य शासनाच्या आदेशाने काल राज्यभरात शाळा सुरू झाल्या. ग्रामीण भागातील शाळांमध्ये पाचवी पासून पुढचे वर्ग तर शहरी भागातील शाळांमध्ये आठवी पासून पुढचे वर्ग सुरू झाले आहेत. शाळा सुरू झाल्या ही समाधानाची बाब असली तरी शाळा संपूर्ण क्षमतेने अजून सुरू झाल्या नाहीत हेही तितकेच खरे आहे. राज्यातील सर्वच शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करणे आवश्यक आहे.
सद्यस्थितीत काल ग्रामीण भागातील पाचवी पासून पुढचे वर्ग तर ग्रामीण भागातील आठवी पासून पुढचे वर्ग सुरू झाले आहेत. पहिली पासून शाळा सुरू झालेल्या नाहीत, त्यामुळे ग्रामीण भागात जिथे शाळाच मुळात पहिली ते पाचवीपर्यंत आहे तिथल्या शाळा अजूनही बंदच आहेत. इगतपुरी सारख्या निमशहरी भागात सुध्दा अद्याप सातवी पर्यंतच्या वर्गांना शाळा भरण्याच्या आदेशाची वाट पाहावी लागत असून फक्त आठवी पासूनचे वर्ग सुरू झाले आहेत. ग्रामीण भागातल्या शाळा पाचवीपासून आणि हाकेच्या अंतरावर असलेल्या इगतपुरी सारख्या शहरात मात्र शाळा आठवीपासून हे विद्यार्थ्यांसह पालकांनाही संभ्रमात टाकणारे आहे.
मुळात कोविडचा संसर्ग ग्रामीण भागात आधीपासूनच नगण्य प्रमाणात आहे, सद्यस्थितीमध्ये तर तो शून्यावर आहे. इगतपुरी तालुक्याचा विचार केल्यास तालुक्याची रुग्णसंख्या गेल्या महिन्याभरापासून एक आकडी स्थिर आहे. मात्र प्रादुर्भाव नसलेला भाग आणि असलेला भाग या दोघांनाही फक्त ग्रामीण आणि शहरी असे दोनच निकष लावले आहेत. त्यामुळे प्रादुर्भाव नसूनही निमशहरी भागांमध्ये शाळा सुरू होवू शकलेल्या नाहीत. आधीच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे, त्यातही आता शाळा उघडुन सुध्दा आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शहरी भागात तरी अजून शाळेसाठी प्रतिक्षाच करावी लागत असल्याने सरसकट पहिली पासून शाळा सुरू करण्यात याव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे.