इगतपुरीनामा विशेष : लॉकडाऊनचा हॅप्पी बर्थ डे !

(टीम इगतपुरीनामा)

उद्याची तारीख आहे 22 मार्च 2021! वर्षभरापूर्वी आजच्याच तारखेला ट्रायल लॉकडाऊन घेण्यात आले आणि त्यानंतर दीर्घकालीन लॉकडाऊन सुरू झाले ते आजतागायत थोड्याफार प्रमाणात का असेना पण सुरू आहेच!

सुरुवातीला 21 दिवसांचे लॉकडाऊन घोषित झाले तेंव्हा बऱ्याच जणांना लॉकडाऊनचा इफेक्ट ध्यानात आलेला नव्हता. सवय नसल्याने 21 दिवस जड गेले खरे, पण फक्त 21 दिवसांचा तर प्रश्न आहे, नंतर होईल सगळं सुरळीत या भाबड्या आशेने सगळ्यांनी हा लॉकडाऊन कसोशीने पाळला आणि यशस्वी सुद्धा केला. या 21 दिवसात मात्र खऱ्या अर्थाने पुढच्या परिस्थितीचा अंदाज आला असं म्हणावं लागेल. कोविडचं संकट फार काळ टिकणार नाही ही भाबडी आशा किती फोल होती हे आपण आता याक्षणी सुद्धा अनुभवत आहोतच!

खरी अडचण सुरू झाली ती दुसऱ्या-तिसऱ्या टप्प्यात! मला चांगलं आठवतं, नुकतीच दुसऱ्या लॉकडाऊनची सुरुवात झाली होती, प्रवासाची सगळीच साधनं जवळपास बंद करण्यात आली होती, त्यामुळे प्रवास हे महाकठीण काम झालं होतं. शिवाय सुरुवातीच्या या काळात कोरोनाची दहशत इतकी जबरदस्त होती की कोरोना झाला म्हणजे माणूस संपलाच अशी लोकांची धारणा झालेली होती, त्यामुळे समोरच्या प्रत्येक माणसाकडे आपोआपच संशयाची सुई सरकत होती आणि अशा परिस्थितीतच इगतपुरीत स्थानकात एक रेल्वे आली, माणसांचा भला मोठा लोंढा घेऊन! माणसं इगतपुरी शहरात, महामार्गावर वाट मिळेल तिकडे पांगली आणि इगतपुरी शहरात एकच हलकल्लोळ सुरू झाला. सुदैवाने तोपर्यंत इगतपुरी शहरात एकही रुग्ण नव्हता त्यामुळे या लोंढ्याची दहशत पसरणे साहजिकच होते.

असो.. तर सध्याच्या परिस्थितीचा विचार केल्यावर असं लक्षात आलं की तेच सर्कल रिपीट होतंय यंदा सुद्धा! फरक इतकाच की तेंव्हा कडक लॉकडाऊन होतं आहे आणि आता त्यात बऱ्यापैकी शिथिलता आहे. तुम्ही नीट आठवा मंडळी, मागच्या वर्षीच्याच परिस्थितीची पुनरावृत्ती सध्या होतेय हे तुम्हालाही पटेल. तेच वाढते आकडे आणि तीच टांगती तलवार! फरक इतकाच की आता आपली भीड जरा (खरं तर बरीच!) चेपली आहे, या सगळ्याची सवय झाली आहे.

अजूनही बरेच प्रश्न अनुत्तरीत आहेत. मध्यंतरी काही गोष्टी सुरू झाल्या. काही शाळा, सरकारी आणि खाजगी आस्थापना पूर्ण क्षमतेने तर काही 50 टक्के क्षमतेने सुरू झाल्या खऱ्या, पण पुन्हा रुग्णसंख्या वाढायला सुरुवात झाली. त्यामुळे धोका अजूनही कायम आहे, हे निश्चित! त्यातही अजून कोरोनाचा नवा विषाणू आल्याच्याही बातम्या येत आहेत. सुदैवाने तो आपल्यापर्यंत अजून तरी पोचलेला नाही ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब! त्यामुळे कोरोना गेला म्हणता म्हणता नव्या जोमाने आपल्यापर्यंत पोचला आहे. पुढे काय होईल याची अजून तरी शाश्वती नाही. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे आता कोरोनाची लस आपल्याला उपलब्ध झाली आहे. वैद्यकीय साधनं किती उपलब्ध आहेत याचा अंदाज आपल्याला आहे.  परिस्थितीचा आपल्याला नेमका अंदाज आल्याने अगदीच नवखी परिस्थिती म्हणता येणार नाही. आणि त्यामुळे परिस्थिती हाताळण्यातही आपण कमी पडणार नाही. जे काही आहे ते समोर आहेच, अजून बरंच काही समोर यायचं आहे. म्हणून सध्या तरी काळजी घेऊया आणि लवकरच सगळं पूर्ववत होईल अशी आशा बाळगूया!

Similar Posts

Comments

  1. avatar
    Sarika Palde says:

    आता फक्त आशेवर जगणारा माणूस असणार. फक्त आणि फक्त आशा..!

Leave a Reply

error: Content is protected !!