ऊर्ध्व कडवा प्रकल्पाच्या भूसंपादन मोजणीला स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध : तालुक्यात १६ धरणे असतांना नव्या धरणाचा घाट कशाला ? – बाळासाहेब धुमाळ

वाल्मीक गवांदे, इगतपुरीनामा न्यूज, दि. ६

इगतपुरी तालुक्यातील घोडेवाडी, टाकेद बुद्रुक, टाकेद खुर्द बारशिंगवे, खेड, अधरवड या ठिकाणी होणारा ऊर्ध्व कडवा प्रकल्प भूसंपादन रद्द करण्यात यावा या मागणीसाठी इगतपुरी तालुका शेतकरी संघटना आक्रमक आहे. संघटनेच्या वतीने स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासन व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना यापुर्वी निवेदन देण्यात आले होते. मात्र तरीही आज प्रांताधिकारी तेजस चव्हाण, जिल्हा पुनर्वसन अधिकारी नितीन गव्हांडे, नांदुरमधमेश्वर प्रकल्पाधिकारी संगिता जगताप, सहायक अभियंता केतन पवार, इगतपुरी भुमि अभिलेख अधीक्षक विष्णु भाबड, शिरस्तेदार मिलींद जगताप यांनी या ठिकाणी येऊन जमिन मोजणी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी या मोजणीला तीव्र विरोध केला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या जमिनीची जबरदस्तीने मोजणी करू नये. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याला प्रशासन जबाबदार राहील अशी भुमिका शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख बाळासाहेब धुमाळ यांनी घेतली.

अखेर घोरपडेवाडी येथे शासनाचे अधिकारी व शेतकरी यांच्यात बैठक झाली. या बैठकीत प्रांताधिकारी यांनी सांगितले की, ऊर्ध्व कडवा प्रकल्पात ज्यांच्या जमीनी संपादित होतील त्यांना समृद्धी महामार्गाप्रमाणे मोबादला मिळेल, बुडीत शेतकऱ्यांना पुनर्वसन लाभ क्षेत्रात जमिनीचे प्लॉट देण्याची योजना असुन आज फक्त जमिनीची मोजणी होऊ द्या अशी मागणी या बैठकीत प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांनी केली. या प्रकल्पाला २००२ मध्ये मान्यता मिळाली असुन भविष्यात या प्रकल्पामुळे स्थानिकांना या पाण्याचा उपयोग होईल अशी माहिती नांदुरमधमेश्वर प्रकल्पाधिकारी संगिता जगताप यांनी दिली. मात्र स्थानिक शेतकऱ्यांनी जमीन मोजणी करण्यास तीव्र विरोध केला. दरम्यान ऊर्ध्व कडवा प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी व इतर शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होणार असल्याने स्थानिक शेतकऱ्यांना उदरनिर्वाहासाठी कुठलेही साधन राहणार नाही. त्यामुळे येथील प्रकल्प बाधित शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. तर या बैठकीत बाळु लक्ष्मण गायकवाड या शेतकऱ्याने तीव्र विरोध दर्शवला असुन बळजबरीने भुसंपादन केल्यास कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा दिला आहे.   

या बैठकीस माजी आयुक्त चंद्रकांत खाडे, शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख बाळासाहेब धुमाळ, संपर्क प्रमुख रामदास गायकर यांच्यासह बाळासाहेब घोरपडे, शंकर चोथवे, नामदेव लहामगे, अशोक वाजे, पोपट लहामगे, विष्णु घोरपडे, तुकाराम लहामगे, युवराज परदेशी, मारूती ढमाळे, देवराम घोरपडे, सचिन भारस्कर, मुरलीधर घोरपडे, लहानु घोरपडे, भगवान कदम, भिमा घोरपडे, आनंदा घोरपडे, आनाजी घोरपडे आदी प्रकल्प बाधित शेतकरी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!